मालेगाव तालुक्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 03:18 PM2019-04-02T15:18:58+5:302019-04-02T15:19:47+5:30
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : प्लास्टिक बंदी असतानाही मालेगाव शहरासह ग्रामीण भागात सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सद्यस्थितीत सगळीकडे लगीनघाई दिसुन येत आहे. यामध्ये प्लास्टिक पत्रावळी, पाणी ग्लास, थर्माकाॅल द्रोण चा सरास वापर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वापर झालेले प्लास्टिक पत्रावळी, पाणी ग्लास, थर्माकाॅल द्रोण नागरिक गावाच्या बाहेर आणुन फेकुन देतात. यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिक पत्रावळी, ग्लास, थर्माकाॅल द्रोण, प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांना दंड न करता प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगर पंचायत व जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष चालविले आहे.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नसल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक जागा, नाल्या, गटारे आदी ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे दिसून येते. नाले-गटारांमधील घाण पाणी वाहून जाण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा अडसर ठरत आहेत. उघड्यावर साचलेल्या प्लास्टिक पिशव्यांमधील खाद्यपदार्थ खाल्ल्याने मोकाट जनावरांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. एकूणच प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी व कचऱ्याची निर्माण झालेली समस्या आदी बाबी ध्यानात घेता यासंदर्भात शासनाने दंडात्मक कारवाईची तरतूद केल्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपंचायत व जिल्हा प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात खुलेआम प्लास्टिक पत्रावळी, पाणी ग्लास, थर्माकाॅल द्रोण , पिशव्यांची विक्री व वापर केला जात आहे.