चार कोटी रुपयांच्या निधीवरून रिसोड नगर परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:53 PM2020-09-27T12:53:10+5:302020-09-27T12:53:52+5:30
हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येही पोहचले होते; परंतू समन्वयातून यावर पडदा पडल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : नगर परिषदेला मिळालेला चार कोटी रुपयांचा निधी ऐनवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने नगर परिषदेच्या सत्ताधारी व विरोधी गटातील सदस्यांमध्ये रात्रीदरम्यान शाब्दीक वाद आणि त्यानंतर हाणामारी झाल्याने शनिवारी दिवसभर या प्रकरणाचीच चर्चा रिसोड शहरामध्ये होती. दरम्यान हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येही पोहचले होते; परंतू समन्वयातून यावर पडदा पडल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.
रिसोड नगर परिषदेला विविध विकासात्मक कामांसाठी शासनाकडून चार कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यामुळे या निधीमधून कोणती कामे करावयाची, याचे नियोजन नगर परिषदेच्या सत्ताधारी गटाकडून व पदाधिकाऱ्यांकडून सुरू असतानाच, चार कोटीचा हा निधी एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याची माहिती सत्ताधाºयांपर्यंत धडकली. यावरून नगर परिषदेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, ऐनवेळी हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्याने सत्ताधारी संतप्त झाले. चार कोटी रुपयांच्या निधीमधून होणारी कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली होणार असल्याने आणि यावर नगर परिषदेचे नियंत्रण राहणार नसल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दीक वाद झाला. या वादाला ‘कमिशन’ची झालर असल्याची चर्चा नगर परिषदेसह शहरात चांगलीच रंगली आहे. रिसोड नगर परिषदेमध्ये सत्ताधारी व विरोधक असे दोन गट आहेत. गत आठवड्यापर्यंत रिसोड नगर परिषदेमध्ये सत्ताधारी व विरोधक एकाच बाकावर असल्याचे चित्र होते. सर्व काही आलबेल असल्याने निधी खर्चाबाबत कुठेही वाच्यता नव्हती. परंतू, चार कोटी रुपयांचा निधी ऐनवेळी वर्ग झाल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडली. शाब्दीक वादानंतर स्थानिक चांदणी चौकात सत्ताधारी व विरोधी गटातील काही सदस्यांमध्ये रात्रीच्या सुमारास हाणामारीही झाली. हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येही पोहचले. परंतू, नगर परिषदेतील निधीचा वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून काही पदाधिकाºयांनी मध्यस्थी करीत समन्वयातून या वादावर पडदा टाकण्यात यश मिळविले. दरम्यान, या घटनेची चर्चा शनिवारी दिवसभर शहरात रंगली होती.
पोलीस स्टेशनच्या आवारातही मारहाण
सत्ताधारी पदाधिकाºयांनी हा निधी पालिकेच्या फंडात वळती करण्यासाठी आग्रह धरला होता. दरम्यानच्या काळात पदाधिकारी व लोकप्रतिनिधीमध्ये निधी वळती करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा सुध्दा झाली होती. परंतू अचानक हा निधी वळती झाल्याची माहिती मिळाल्याने सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद झाला. हा वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्यानंतर येथेही दोन नगरसेवकांमध्ये शाब्दीक बाचाबाची आणि मारहाण झाल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.