शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये मारहाण!

By Admin | Published: July 17, 2017 02:39 AM2017-07-17T02:39:28+5:302017-07-17T02:39:28+5:30

सावरगाव येथील घटना : आरोपी भावावर गुन्हा दाखल

Fighting between two brothers in farming! | शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये मारहाण!

शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये मारहाण!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: वडिलांनी दोन भावांमध्ये शेतीची हिस्सेवाटणी करून दिली; परंतु त्यावर समाधान न मानता दिव्यांग असलेल्या भावाच्या हिश्शातील दोन गुंठे शेती मिळविण्याच्या हव्यासापायी एका धडधाकट इसमाने त्याच्याच सख्ख्या भावाला मारहाण केली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी १६ जुलै रोजी आरोपी भावाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पंढरी रामभाऊ कड (वय ४५ वर्षे, रा. सावरगाव बर्डे, ता. वाशिम) यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की माझा लहान भाऊ पांडुरंग रामभाऊ कड हा बायका-पोरांसह घराशेजारीच वास्तव्याला आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून तो शेती वाटपाच्या मुद्यावरून मला व वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करण्याच्या धमक्या द्यायचा. त्याला माझ्या हिश्शातून दोन गुंठे जमीन पाहिजे आहे. मी व वडिलांनी त्याला अनेक वेळा समजावून सांगूनही तो त्याचा हट्ट सोडत नव्हता. दरम्यान, १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मी तीनचाकी सायकलने घरी निघालो असताना पांडुरंगने जवळ येऊन मारहाण करायला सुरुवात केली. न मारण्याची विनवणी करूनही त्याने ऐकले नाही, तर जवळच पडून असलेल्या काठीनेही मारहाण केली. यात माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. एवढेच नव्हे तर सायकलसकट उलटे पाडले. यावेळी माझा मुलगा आणि माझा दुसरा भाऊ विठ्ठल कड हे धावत घटनास्थळी आल्यामुळे माझा जीव बचावला.
पंढरी रामभाऊ कड यांनी दाखल केलेल्या अशा आशयाच्या तक्रारीवरून वाशिम ग्रामीण पोलिसांनी आरोपी पांडुरंग रामभाऊ कड याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Fighting between two brothers in farming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.