हमीभावाने शेतमालाची खरेदी न करणार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:49 AM2017-10-16T01:49:02+5:302017-10-16T01:51:14+5:30
वाशिम: यावर्षी निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत आहे तर दुसरीकडे हमीभावानुसार बाजार समित्यांमध्येही शेतमालाची खरेदी होत नसल्याने शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यावर्षी निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत आहे तर दुसरीकडे हमीभावानुसार बाजार समित्यांमध्येही शेतमालाची खरेदी होत नसल्याने शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या पृष्ठभूमीवर हमीभावाने शेतमालाची खरेदी न करणार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी शुक्रवारी शासनाकडे केली आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसात सातत्य नव्हते. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर गायब झालेला पाऊस १५ ते २0 दिवसाने परतला. त्यानंतरही पावसात सातत्य राहिले नाही. ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यामुळे आता मूग, उडीद पाठोपाठ सोयाबीनच्या एकरी उत्पादनातही प्रचंड घट येत आहे. अशातच हमीभावानुसार शेतमालाची खरेदी होत नसल्याने शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शेतकर्यांच्या कळवळा असल्याचे दाखविणार्यांनी किमान हमीभावाने तरी सोयाबीन, मूग, उडीद आदी शेतमालाची खरेदी करून शे तकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी युसूफ पुंजानी यांनी केली. शासनाने सोयाबीन, मूग, उडीद यासह सर्व शेतमालाचे हमीभाव जाहीर केले आहेत. या हमीभावाने शेतमालाची खरेदी करण्याचे फर्मानही सोडले आहे. तरीदेखील वाशिम जिल्हय़ात शे तमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ऐन दिवाळीच्या सणादरम्यानच शेतमालाचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत. शे तकर्यांना दिलासा मिळावा म्हणून हमीभावाने शेतमालाची खरेदी व्हावी, हमीभाव डावलणार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, वाशिम जिल्हय़ात नाफेड खरेदी केंद्र सुरू करावे आदी मागण्या पुंजानी यांनी केल्या आहेत.