पाच अधिका-यांसह १९ बसचालकांवर गुन्हे दाखल
By admin | Published: October 7, 2015 01:57 AM2015-10-07T01:57:56+5:302015-10-07T01:57:56+5:30
खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक, आस्थापना अधिकारीसह दोन वैद्यकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागात २0 चालकांनी नजरेमध्ये दोष असल्याचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून चालक पदावरून सुरक्षारक्षक (वॉचमनची) पदावर नोकरी मिळविली होती; मात्र सादर केलेले हे वैद्यकीय प्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाल्यामुळे अमरावती विभागाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी कृष्णकांत कुमरे यांच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी पाच अधिकार्यांसह १९ बसचालकांवर गुन्हे दाखल केले आहे. विशेष म्हणजे या पाच अधिकार्यांमध्ये नवृत्त एसटीबस विभागनियंत्रक चंद्रकांत बोरसे, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शिवाजी गजरे, डॉ. अशोक हिवाळे, बुलडाणा एसटीबस आगारातील डॉ.चवरे व आस्थापना अधिकारी सुभाष धोंडू पाटील यांचा समावेश आहे. याप्रकरणी लोकमतने २६ सप्टेंबर २0१५ रोजी हॅलो १ पानावर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. मागील २0१३-१४ मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागात डोळ्यात रंग आंधळेपणा असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र महामंडळाला सादर करून एकाच वेळी तब्बल १९ चालकांनी सुरक्षा रक्षक या पदावर आपली सेवा करून घेतली होती. हे करीत असताना महामंडळाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून संबंधित अधिकार्यांना हाताशी धरून हा प्रकार घडला होता. या प्रकरणाच्या तक्रारी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून चौकशी सुरू झाली. या १९ कर्मचार्यांची पुन्हा सक्षम वैद्यकीय अधिकार्यांकडून डोळ्याची तपासणी करण्यात आली असता, त्यांच्या डोळ्यात कोणत्याही प्रकारचा नजरेचा दोष आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून चालक पदावरून सुरक्षा रक्षक पदावर नोकरी मिळविल्याचे सिद्ध झाले होते. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्यांमार्फत चौकशीसुद्धा झाली. मागील एक वर्षापासून सुरू असलेले हे प्रकरण अंतिम टप्प्यात असताना या कर्मचार्यांना कोणत्या डॉक्टरांनी नजरेचे सदोष वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. याशिवाय नियमाचे पालन न करता आणि वरिष्ठांची परवानगी न घेता कोणत्या आधारावर तत्कालीन अधिकार्यांनी या १९ चालकांना तडकाफडकी चालक पदावरून सुरक्षा रक्षक पदावर आदेश दिले? याची एसटीच्या सुरक्षा विभागाने सखोल चौकशी केली असता, सदर प्रकरण उघडकीस आले. यामुळे अमरावती विभागाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी कृष्णकांत कुमरे यांच्या तक्रारीवरून आज १९ चालकांसह पाच अधिकार्यांवर बुलडाणा शहर पोलिसात भांदविच्या ४२0, ४६७, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.