अखेर चाकातिर्थ-कुरळा जलवाहिनीचा मुहुर्त निघाला; मालेगावकरांची पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:55 PM2018-03-08T15:55:40+5:302018-03-08T15:55:40+5:30
मालेगाव: शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली.
मालेगाव: शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली. तब्बल १ कोटी ३४ लाख रुपये खर्च असलेल्या या योजनेमुळे मालेगावकरांची पाणीटंचाईची समस्या मिटण्याची चिन्हे दिसत आहेत.
मालेगाव शहरालगतच काही अंतरावर कोल्ही, केळी आणि चाकातिर्र्थ हे लहान मोठे प्रकल्प आहेत. तथापि, चाकातिर्थ वगळता उन्हाळ्याच्या दिवसांत इतर प्रकल्प तळ गाठतात; परंतु चाकातिर्थ प्रकल्पातील पाणीसुद्धा आरक्षित असल्याने आणि प्रशासकीय मान्यता नसल्याने मालेगावकरांना त्याचा फायदा होऊ शकत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन या प्रकल्पातून कुरळाधरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मंत्रालय स्तरावर त्या प्रस्तावाला १२ फेब्रुवारी रोजी मान्यता मिळाली आणि या योजनेच्या कामासाठी १ कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. मालेगाव शहरात असलेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता या योजनेचे काम युद्धपातळीवर होण्याची मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत होती. अखेर सर्व प्रशासकीय कार्यवाही पार पडल्यानंतर ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा मिनाक्षी सावंत, बबनराव चोपडे, तहसीलदार राजेश वजिरे, मुख्याधिकारी गणेश पांडे, नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापती रामदास बळी, गजानन सारस्कर, रेखा अरुण बळी, अफसाना तस्लिम, अमोल सोनोने, उमेश खुळे, शशिकांत टनमने, तस्लिम सय्यद, किशोर महाकाळ, संतोष सुरडकर, संतोष जोशी, चंदू जाधव, डॉ. निलेश मानधने, संतोष बनसोड, प्रमोद हरने, मनोज सरदार आदि सर्व नगरपंचायत सदस्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
चाकातीर्थ ते कुरळा तातडीच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाची मंजुरात मिळाली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आज काम सुरु करण्यात आले आहे. १५ ते २० दिवसांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत.
-गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, मालेगाव