अखेर व्यापारी संकुलातील अतिक्रमण काढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:22 PM2020-01-14T15:22:54+5:302020-01-14T15:22:59+5:30
नगरपरिषद प्रशासनासह नगराध्यक्ष आसनकर व नगरसेवकांच्या उपस्थितीत १३ जानेवारी अतिक्रमण हटविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोड नगर परिषदेच्या व्यापारी संकुलमध्ये काही जणांनी अतिक्रमण केले असतांनाही याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत असल्यासंदर्भात लोकमतच्यावतिने ११ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची ताबडतोब दखल घेत नगरपरिषद प्रशासनासह नगराध्यक्ष आसनकर व नगरसेवकांच्या उपस्थितीत १३ जानेवारी अतिक्रमण हटविण्यात आले.
रिसोड नगर परिषद जवळ असलेल्या व्यापारी संकुलामध्ये काहीजणांनी चक्क दुकानांच्या आत ताबा करुन अतिक्रमणधारकांनी या संकुलामध्ये आपले वास्तव्य सुरु केले होते. हे संकुल नगरपरिषदेने मागील दोन वषार्पासून बांधले असून काही तांत्रिक अडचणीमुळे याचा लिलाव न झाल्याने अतिक्रमकांनी आपला डेरा तेथे टाकला होता. याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका सुरु असल्याने त्यामध्ये सर्व कर्मचारी व्यस्त आहेत. निवडणुका संपल्याबरोबर अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. १३ जानेवारी रोजी नगरपालिका प्रशासनासह नगराध्यक्ष प्रा. विजयमाला आसनकर, नगरसेवकांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवून दुकानांना कुलूप लावण्यात आले. तसेच यानंतर येथे कोणी अतिक्रमण केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सांगण्यात आले.
नगरपलिका व्यापारी संकुलात अतिक्रमण करणाऱ्यांना तेथून काढण्यात आले आहे. तसेच जी दुकाने संकुलातील खाली होती त्यांना सूध्दा कुलूप लावून टाकण्यात आल्याने आता अतिक्रमण होणार नाही. तरी सुध्दा व्यापारी संकुल परिसरातही कोणी अतिक्रमण केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
- प्रा. विजयमाला आसनकर
नगराध्यक्ष, रिसोड नगर परिषद