अखेर मालेगाव पंचायत समितीला मिळाले प्रभारी बीडीओ
By दिनेश पठाडे | Published: August 21, 2023 06:29 PM2023-08-21T18:29:48+5:302023-08-21T18:30:34+5:30
मालेगाव येथे पूर्वी कार्यरत गटविकास अधिकारी काळबांडे हे ३१ जुलैला सेवानिवृत्त झाले होते.
वाशिम: मालेगाव येथील पंचायत समितीचा कारभार १७ ते १८ दिवसापासून गट विकास अधिकाऱ्याविना चालू होता. त्यामुळे कामांत खोळंबा येत होता. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक होऊन गट विकास अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून कायमस्वरूपी गट विकास अधिकारी देण्याची मागणी केली होती. 'लोकमत'नेही बीडीओ देता बीडीओ या मथळ्याखाली २० ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून समस्या उजागर केले होते. याची दखल घेत येथे प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून कैलासराव घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवार(दि.२१) रोजी पदभार स्विकारुन कामकाज सुरु केले.
मालेगाव येथे पूर्वी कार्यरत गटविकास अधिकारी काळबांडे हे ३१ जुलैला सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतरही गटविकास अधिकारी यांची नियुक्त न झाल्याने नागरिकांची कामे खोळंबली होती. शिवाय विकासकामे देखील प्रभावित झाली होती. जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेत कैलासराव घुगे यांची प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे मालेगाव पंचायत समितीचा कारभार काही प्रमाणात सुरळीत चालून ग्रामीण भागातील जनतेच्या कामाला गती येणार आहे. दरम्यान, पंचायत समितीला नियमित गटविकास अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी केले जात आहे.