अखेर रस्त्याची डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:56 AM2021-02-26T04:56:48+5:302021-02-26T04:56:48+5:30
माहुली : अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बेलोरा गावाजवळील पुलाचे बांधकाम सुरू असताना संबंधित कंत्राटदाराने रहदारीसाठी ...
माहुली : अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बेलोरा गावाजवळील पुलाचे बांधकाम सुरू असताना संबंधित कंत्राटदाराने रहदारीसाठी बाजूला कच्चा रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. याच पुलाच्या बाजूला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठ्याची जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहेच. शिवाय यामुळे वाहनांच्या अपघाताला निमंत्रण देत आहे.
"जलवाहिनी फुटल्याने रस्त्याची दुरवस्था" व "माहुली बेलोरा रस्त्यांचे वास्तव्य अपघातास निमंत्रण" ही बातमी २३ फेब्रुवारीला लोकमत वृत्तपत्रात प्रकाशित झाल्याबराेबर संबंधित कंत्राटदाराने रस्त्यांवर मुरूम माती टाकून डागडुजी केली. मात्र, रस्ता जशास तसा पुन्हा तयार झाला. आर्णी ते अकोला रस्ता गेल्या काही महिन्यांपासून बेलोरा जोडी पुलांचे बांधकाम चालू आहे. वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून कंत्राटदाराने खालच्या भागात कच्चा रस्ता तयार केला असून, दिग्रस ते अकोलाकडे ये-जा करणाऱ्या याच रस्त्यावर वाहन जातात. मात्र, रस्त्यावरील खड्डा चुकवताना एक चारचाकी वाहन रस्त्यांच्या मधोमध बंद पडले. यामुळे वाहतूक दोन तास खोळंबली हाेती. दोन किलोमीटरपर्यंत गाड्यांची रांग लागली हाेती. या रस्त्याच्या कडेला जलवाहिनी फुटल्याने पाण्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होतो व याच लिंकमधून दूषित पाणी मानोरावासियांना पिण्यासाठी जाते. त्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. जलवाहिनी फुटल्याने रस्त्याची दुरवस्था ही बातमी प्रकाशित होताच संबंधित कंत्राटदाराने मुरूम माती टाकून रस्त्याची डागडुजी केली. तर मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा अभियंता तथा अधिकाऱ्यांचे या फुटलेल्या पाईपलाईनकडे लक्ष जात नाही.
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महामार्गाच्या बांधकामादरम्यान अनेकवेळा पाईपलाईन फोडण्यात येते. याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधितांची आहे. या रस्ता बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना कळविण्यात आले आहे. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यांचे अधिकारी या कामावर विशेष लक्ष देत नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा, मानोराचे खराटे यांनी सांगितले.
खराटे *
शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणी पुरवठा
मानोरा