वाशिम येथे अखेर रेल्वे पोलीस रुजू, खासदार भावना गवळींच्या पाठपुराव्याला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 12:52 PM2018-04-26T12:52:36+5:302018-04-26T12:52:36+5:30
रेल्वे स्थानकावर प्रवाशांना येणा-या अडचणींबाबत रेल्वे पोलीस चौकीची मागणी करण्यात येत होती. यासंदर्भात खासदार भावना गवळी यांनी नागरिकांच्या निवेदनानुसार दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे पत्र पाठवून संबंधित समस्येवर विचार करण्याची सूचना केली.
वाशिम: येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना येणा-या अडचणींबाबत रेल्वे पोलीस चौकीची मागणी करण्यात येत होती. यासंदर्भात खासदार भावना गवळी यांनी नागरिकांच्या निवेदनानुसार दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे पत्र पाठवून संबंधित समस्येवर विचार करण्याची सूचना केली. त्यावर तातडीने कार्यवाही करून रेल्वेच्या वतीने गुरुवारी रेल्वे पोलीस येथे रुजू केले. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वाशिम रेल्वेस्थानकावर पाकिटमारी, साहित्य चोरीच्या घटनांत वाढ झाली होती, तसेच रेल्वेमार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातच यासंदर्भात तक्रार करण्यासाठी अकोला येथे जावे लागत होते. या पृष्ठभूमीवर शहरातील नागरिक, प्रवाशांच्या वतीने खासदार भावना गवळी यांच्याकडे निवेदन सादर करून वाशिम रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलीस चौकी देण्याची मागणी करण्यात आली होती. खासदार भावना गवळी यांनी तातडीने याबाबत दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली. त्यानुसार दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त नांदेड यांना पत्र पाठवून तातडीने योग्य ती अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नागपूर येथील रेल्वे पोलीस अधीक्षकांना आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली. तथापि, वाशिम येथे तातडीने रेल्वे पोलीस चौकी स्थापन्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने नागपूर रेल्वे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार त्याची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरती उपाययोजना म्हणून वाशिम येथे रेल्वे पोलीस कर्मचारी गुरुवारी नियुक्त केले आहेत. या ठिकाणी २४ तास रेल्वे पोलीस तैनात राहणार असून, दिवसाच्या कालावधीत दोन आणि रात्रीच्या वेळी दोन पोलीस येथे प्रवाशांसाठी राहणार आहेत.