अन् रामगाव बसफेरी धावू लागली नियमित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:54 PM2019-09-30T17:54:16+5:302019-09-30T17:54:33+5:30
बस येते किंवा नाही, याचा अंदाज लागत नसल्याने सायखेडा येथील विद्यार्थिनींना ३ कि.मी. प्रवास पायदळ करावा लागत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा (वाशिम) : मंगरूळपीर आगाराची रामगाव बसफेरी अनियमित व वेळेवर येत नसल्याने विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम होत असे. यामुळे विद्यार्थीनी व पालकांनी आक्रमक पवित्रा घेत २७ सप्टेंबर रोजी थेट मंगरुळपीरच्या आगारात धडक देत आगारप्रमुखांना निवेदन सादर करून बस वेळेवर सोडण्याची मागणी केली होती, तसेच लोकमतनेही २८ सप्टेंबरच अकांत ‘बसफेरी अनियमीत; आक्रमक विद्यार्थींनीची आगारात धडक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून आगार प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन ही बसफेरी आता नियमित सुरू करण्यात आली आहे.
मंगरूळपीर आगाराची मंगरुळपीर-रामगाव ही अनेक गावातील प्रवाशासाठी एकमेव बस आहे. मानोली व मंगरूळपीर येथे शिक्षण घेण्याकरीता ६० मुली आणि १० मुले दररोज याच बसने प्रवास करतात; परंतु ही बस कधीकधी सायंकाळी उशिरा येत असल्याने मुलींना रात्रीचा प्रवास करावा लागत होता. त्यातच बस येते किंवा नाही, याचा अंदाज लागत नसल्याने सायखेडा येथील विद्यार्थिनींना ३ कि.मी. प्रवास पायदळ करावा लागत होता; परंतु मानोली ते रामगाव हे अंतर ६ किलोमीटर असल्याने त्या मुलींना पायदळ प्रवास शक्य होत नव्हता. त्यातच रात्रीचा वेळ पाहून खाजगी वाहनधारक मनमानी प्रवासभाडे आकारतात. त्यामुळे मुली घरी येईपर्यंत पालक चिंताग्रस्त राहत होते. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थीनी आणि पालकांनी आक्रमक पवित्रा घेत २७ सप्टेंबर रोजी थेट मंंगरुळपीरच्या आगारात धडक दिली. यावेळी ५० विद्यार्थीनींनी बस वेळेवर सोडण्यासाठी आगारप्रमुखांना निवेदनही दिले. बसफेरीच्या नियमिततेमुळे विद्यार्थीनींना सायंकाळच्या वेळी सहन करावा लागत असलेला त्रास, ही गंभीर बाब असतानाही आगार प्रशासन दखल घेत नसल्याने लोकमतने २८ सप्टेंबरच्या अंकात ‘बसफेरी अनियमीत; आक्रमक विद्यार्थींनीची आगारात धडक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून आगार प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन ही बसफेरी आता नियमित सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या बसने प्रवास करणाºया विद्यार्थीनींना मोठा दिलासा मिळाला असून, पालकवर्गातही समाधानाचे वातावरण आहे. (वार्ताहर)
ग्रामीण भागातील विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होवू नये.यासाठी आम्ही खूप काळजी घेतो. मात्र जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू असल्याने कधी कधी आमचाही नाईलाज होतो. रामगाव बसफेरी नियमित ठेवण्याचा प्रयत्न करू.
-जी. बी. झळके
सहाय्यक वाहतूक निरीक्षक
मंगरूळपीर आगार