शिक्षकांसमोर आर्थिक पेच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:33 PM2020-09-16T13:33:48+5:302020-09-16T13:34:01+5:30
काही शिक्षकांनी तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी रोजगार शोधला तर काही शिक्षक आर्थिक संकटाशी दोन हात करीत वाटचाल करीत आहेत.
- संतोष वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एकिकडे कोरोना विषाणू संसर्गाचे संकट तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शाळाही बंद. अशा परिस्थितीत खासगी कॉन्व्हेंट, विनाअनुदानित शाळेवरील अनेक शिक्षकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामधून मार्ग काढत काही शिक्षकांनी तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी रोजगार शोधला तर काही शिक्षक आर्थिक संकटाशी दोन हात करीत वाटचाल करीत आहेत.
यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाने सर्वांचेच नियोजन कोलमडले आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. तेव्हापासून शाळा बंद आहेत. सरकारी, अनुदानित, अंशत: अनुदानित शाळेवरील शिक्षकांना नियमित वेतन असल्याने त्यांना आर्थिक संकटाशी दोन हात करण्याची वेळ तुर्तास तरी आली नाही. परंतू, कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित, खासगी कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक कोंडीतून जावे लागत आहे. काही शिक्षकांनी पर्यायी मार्ग शोधले आहेत. परंतू, लॉकडाऊनमध्ये त्यामधून फारशी मिळकत नसल्याच्या व्यथाही या शिक्षकांनी मांडल्या. गजानन लांभाडे नामक शिक्षकाने संगणक लॅबच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी रोजगार शोधला. संगणक शिकविणे, आॅनलाईन अर्ज भरणे आदी कामे ते करीत आहेत. शिक्षकेतर कर्मचारी मिलिंद सरकटे हे किराणा दुकानाच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. ज्ञानेश्वर मांडे यांनी वडीलोपार्जित शेतीला हातभार लावून आर्थिक संकटावर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शेलुखडसे व रायताळवाडी येथील शिक्षकाने आॅनलाईन पद्धतीने खासगी शिकवणी घेऊन आर्थिक संकटाशी दोन हात केले आहेत. लॉकडाऊलनच्या या काळात खासगी शिक्षकांना शासनाकडून एखाद्या ‘पॅकेज’ची अपेक्षा आहे.
अशा आहेत खासगी शिक्षकांच्या मागण्या
शासनाने २० टक्के अनुदानाचा प्रश्न निकाली काढावा. विनाअनुदानित शाळेवरील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.
शेतकरी पॅकेजच्या धर्तीवर कोरोनाचे संकट टळेपर्यंत विनाअनुदानित, कॉन्व्हेंटवरील शिक्षकांसाठी एखादे पॅकेज जाहिर करावे.
सुशिक्षित बेरोजगारांना जसा भत्ता दिला जातो, त्याप्रमाणे खासगी शिक्षकांनाही या आर्थिक संकटाच्या काळात भत्ता देण्यात यावा.
विनाअनुदानित शाळेवरील शिक्षकांचा २० टक्के वेतन अनुदानाचा प्रश्न निकाली निघाला नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी पॅकेजच्या धर्तीवर शासनाने खासगी शिक्षकांसाठी पॅकेज जाहिर करून आर्थिक हातभार लावावा.
- गजानन लांभाडे, शिक्षक