सौदी अरेबियात राहणाऱ्या गावच्या सुपूत्रांकडून कोरोना रुग्णांना आर्थिक दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:50+5:302021-05-04T04:18:50+5:30
देपूळ : वाशिम तालुक्यातील शेलू बु. गावातील सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर गावातच उपचार मिळावेत, या उद्देशातून ...
देपूळ : वाशिम तालुक्यातील शेलू बु. गावातील सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर गावातच उपचार मिळावेत, या उद्देशातून शेलू बु. येथील सैनिक (जवान) एकवटले असून, कोरोनाबाधितांवरील उपचाराचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. ही वार्ता सौदी अरेबियात राहणाऱ्या शेलू येथील तिघांना समजताच, त्यांनीदेखील मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. औषधी व वाफ घेण्याचे यंत्र २५९ नागरिकांना पुरविले असून, यापुढेही खर्च करण्याचा संकल्प केला.
आपल्या गावातील नागरिकांना कोविडपासून वाचविण्यासाठी हीच वेळ आहे, या उद्देशाने प्रेरित होऊन जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी शेलू बु. येथील सैनिकांनी व ग्रामपंचायतने कोविड रुग्णांना गावातच मोफत उपचार देणे सुरू केले आहे. याबाबत ‘लोकमत’ने २८ एप्रिल रोजी वृत्तही प्रकाशित केले. या कार्याची माहिती शेलू बु. येथील रहिवासी तथा व्यवसायासाठी सौदी अरेबिया येथे गेलेल्या तिघांना मिळताच, मदतीसाठी तेदेखील सरसावले आहेत. रविवार, २ मे रोजी ग्राम विकास अधिकारी राहुल उंद्रे यांच्यामार्फत औषधी तसेच वाफ घेण्यासाठी यंत्र देण्यात आले. सध्या औरंगाबाद येथे डॉ. राजाराम दमगीर यांनी गावातील जनतेच्या आरोग्यासाठी २१ हजार रुपये दिले असून सौदी अरेबियामध्ये राहणारे शेलू येथील रहिवासी किशोर उमाळे, राजू तडसे व शिवाजी उमाळे या तिघांनीदेखील प्रत्येकी १० हजार रुपये गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ऑनलाईन पद्धतीने वळते केले आहेत.