पवनचक्क्यांचे तुटले पाते; ऊर्जानिर्मिती ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 10:19 PM2017-08-26T22:19:31+5:302017-08-26T22:20:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: स्थानिक जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासह इतरही प्रशासकीय कार्यालयांवर लावण्यात आलेल्या पवनचक्क्या (अपारंपरिक ऊर्जास्त्रोत) देखभाल-दुरूस्तीअभावी नादुरूस्त अवस्थेत बंद पडल्या आहेत. यामुळे केवळ देखभाल-दुरूस्तीअभावी अपारंपरिक ऊर्जास्त्रोत निर्मितीची व्यवस्था उभी असूनही संबंधित कार्यालयांना महिन्याकाठी हजारो रुपये वीज देयक भरावे लागत असून पवनचक्क्या उभारणीसाठी लागलेला लाखो रुपयांचा खर्च देखील पूर्णत: व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर सौरऊर्जा संयंत्रांसोबतच पवनचक्की संयंत्रही बसविण्यात आलेले आहे; परंतू ते गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरूस्त असल्याने दोन्हीही प्रकारे तयार होणारी वीजनिर्मिती पूर्णत: ठप्प होवून महावितरणकडून पुरविली जाणारी वीज वापरली जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातही सहाठिकाणी पवनचक्की संयंत्र लावण्यात आलेले असून त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, सोसाट्याच्या वाºयाने यातील बहुतांश संयंत्रांचे पाते तुटून खाली पडले असून ते पुन्हा लावण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी, यामाध्यमातून सुरू झालेली वीजनिर्मिती देखील ठप्प झाली आहे. यायोगे अपारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरासंबंधी शासनाने चालविलेले प्रयत्न निव्वळ फार्स ठरत असल्याचे सिद्ध होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावरील सौरऊर्जा संयंत्र आणि पवनचक्कीच्या दुरूस्तीबाबत प्रयत्न सुरू आहेत. यानुषंगाने मिटकॉनकडे पत्रव्यवहार करून संबंधित कंत्राटदारास ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याबाबत कळविण्यात आले आहे. यासह खासगीत कंत्राटदाराशी बोलून दुरूस्तीचा खर्च काढून तशी तरतूद करण्याची बाब प्रस्तावित आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी काढला जाईल.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम