रिसोड पंचायत समितीच्या जुन्या इमारतीला आग, कृषी विभागाचे दस्तऐवज जळून खाक
By नंदकिशोर नारे | Published: April 19, 2024 01:41 PM2024-04-19T13:41:13+5:302024-04-19T13:41:36+5:30
अग्निशामक दलाच्या गाड्या त्वरित दाखल झाल्याने इतर कोणत्याही कार्यालयाला आगीमुळे नुकसान झाले नाही
रिसोड: स्थानिक पंचायत समितीच्या जुन्या इमारतीला १८ एप्रिलच्या रात्री ८.३० वाजता अचानक आग लागल्यामुळे कृषी विभाग कार्यालयातील दस्तऐवज जळून खाक झाले.
रिसोड पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमध्ये असलेल्या कृषी विभागाच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत जुने दस्तऐवज जळून खाक झाल्याचे बोलल्या जात आहे . आग लागल्याची माहिती मिळताच रिसोड पंचायत समितीचे सदस्य संदीप धांडे यांनी त्वरित समोरील गेटची कुलूप उघडून ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाला सूचना केली. त्यावरून अग्निशामक दलाच्या गाड्या त्वरित दाखल झाल्या यामुळे इतर कोणत्याही कार्यालयाला आगीमुळे नुकसान झाले नाही.
आग बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रसंगी पंचायत समितीचे कर्मचारी तसेच पंचायत समिती सभापती सुभाष खरात यांनी सुद्धा आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य केले.