आग लागल्याने कापसासह ट्रक जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:12 PM2019-04-04T17:12:05+5:302019-04-04T17:12:14+5:30
कारंजा अमरावती मार्गावरील घटना: १० लाखांचे नुकसान
कामरगाव (वाशिम): चालकाचे नियंत्रण सुटून कापसाने भरलेला ट्रक उलटला. यामुळे ट्रकला आग लागल्याने कापसासह ट्रक जळून खाक झाल्याची घटना कारंजा-अमरावती मार्गावरील टाकळी फाट्यानजिक ४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. सदर घटनेत जवळपास १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कामरगाव चौकीतील पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत कारंजा न प च्या अग्निशमनदलाच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न केले.
प्राप्त माहितीनुसार, कापसाने भरलेला ट्रक परभणीहून अमरावतीकडे जात असताना कारंजा-अमरावती मार्गावरील टाकळी फाट्यानजीक सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळील वळणमार्गावर समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात उलटून विजेच्या खांबावर आदळला. त्यावेळी विजेच्या खांबावरील जीवंत तारांचे घर्षन होऊन पडलेल्या ठिणगीने ट्रकमधील कापसाने पेट घेतला. यात कापसासह ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला.
प्राथमिक अंदाजानुसार ट्रकमधील जवळपास ८ टन कापूस व ट्रकची किंमत असे मिळून १० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कामरगाव चौकीतील पोलीस उपनिरीक्षक पंडित व सहकारी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. व कारंजा न.प.च्या अग्निशमनदलाला पाचाराण करण्यात आले. काही तासानंतर आग आटोक्यात आली; परंतु त्यापुर्वी ट्रक व कापुस आगीत खाका झाला होता.