उंबर्डाबाजार येथे घराला भीषण आग; माय-लेकींचा होरपळून मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:31 PM2019-01-14T22:31:56+5:302019-01-14T22:32:06+5:30
उंबर्डाबाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास असलेल्या गणेश मारोटकर यांच्या घराला सोमवार, १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
उंबर्डाबाजार : उंबर्डाबाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास असलेल्या गणेश मारोटकर यांच्या घराला सोमवार, १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत माय-लेकींचा होरपळून जागीच मृत्यू झाला; तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, की ग्राम उंबर्डाबाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टी भागात राहणाºया गणेश मारोटकर यांच्या घराला सोमवारी सायंकाळी अचानक आग लागली. ही आग एवढी भीषण होती, की काही कळण्याच्या आतच आगीने घरात असलेल्या सुमन वसंत मारोटकर (वय ५० वर्षे) आणि पंचफुला मारोती गुहाडे (वय ७५ वर्षे) या माय-लेकींचा त्यात अक्षरश: होरपळून मृत्यू झाला; तर वसंत मारोटकर आणि गणेश मारोटकर हे दोघे बापलेक या आगीत गंभीररित्या भाजून जखमी झाले. त्यांना उंबर्डाबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.
आगीच्या या घटनेत मारोटकर यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य देखील जळून खाक झाले. घटनास्थळाला कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी भेट दिली. घटनेची वार्ता कळताच कारंजा नगर परिषदेने विनाविलंब अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल केले. मात्र, तोपर्यंत बराच वेळ उलटून गेला होता. गावकºयांनीही आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केले.
"
गॅस सिलींडर लिकेजमुळे घडली घटना
उंबर्डाबाजार येथे घराला लागलेल्या आगीच्या घटनेबाबत ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आग घरात असलेल्या गॅस-सिलींडरच्या लिकेजमुळे घडल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.