रेडिमेड कापड दुकानाला आग; चार लाखांचे साहित्य जळून खाक!
By सुनील काकडे | Published: February 9, 2024 04:55 PM2024-02-09T16:55:28+5:302024-02-09T16:58:29+5:30
‘माऊली लेडीज ॲन्ड चिल्ड्रेन्स वेअर’ या रेडिमेड कापड दुकानाला आग लागून कपड्यांचा माल जळून खाक झाला.
सुनील काकडे, वाशिम : कारंजा शहरातील पुंजानी कॉम्प्लेक्सस्थित ‘माऊली लेडीज ॲन्ड चिल्ड्रेन्स वेअर’ या रेडिमेड कापड दुकानाला आग लागून कपड्यांचा माल जळून खाक झाला. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किट होवून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार. पुंजानी कॉम्प्लेक्समध्ये सोपान झळके यांचे रेडिमेड कापड विक्रीचे दुकान आहे. झळके हे ८ फेब्रुवारीला रात्री ८.३० वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले. मात्र, काहीच वेळात दुकानाला आग लागल्याची माहिती त्यांना कळाली. शेजारच्या दुकानदारांनी दुकानाचे दार तोडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळानंतर आगीवर नियंत्रण देखील मिळाले; मात्र तोपर्यंत दीड लाख रुपये किंमतीचे रेडिमेड कपडे, ६० ते ७० हजार रुपयांची रोख रक्कम, बॅटरी, इन्वर्टर, डिस्प्ले आदी साहित्य आगीत जळून खाक झाले होते. शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.