कारंजा येथील सी. बी. अॅग्रोटेकला आग; साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 04:28 PM2018-03-03T16:28:54+5:302018-03-03T16:28:54+5:30
कारंजा लाड (वाशिम) : येथील कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील चंदनवाडी परिसरातील सी. बी. अॅग्रोटेक या जीनींग प्रेसींगला आग लागून सुमारे साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना शनिवार, ३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्यादरम्यान घडली.
कारंजा लाड (वाशिम) : येथील कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील चंदनवाडी परिसरातील सी. बी. अॅग्रोटेक या जीनींग प्रेसींगला आग लागून सुमारे साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना शनिवार, ३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्यादरम्यान घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, कारंजा येथील चंदनवाडी परीसरात बरडिया यांच्या मालकीच्या सी.बी. अॅग्रोटेकमध्ये कापसाची खरेदी केल्या जाते. दरम्यान, खरेदी केलेला कापूस ज्याठिकाणी साठवून ठेवला होता, तेथे शनिवारी दुपारी अचानक आग लागली. त्यात साधारणत: साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. बाजारभावाप्रमाणे अंदाजे दीड ते दोन कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
आग लागताच इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध असलेल्या आग विझविण्याच्या साहित्यासह पाण्याचा वापर करण्यात आला. नंतर लगेचच आग विझविण्यासाठी कारंजा नगर परिषद तसेच मंगरूळपीरच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. स्थानिक रहीवासी जगन्नाथ कश्यप यांनीही आपले पाण्याचे टँकर घटनास्थळी पाठविले. त्यामुळे काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस आगीच्या भक्षस्थानी सापडला होता. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. वृत्त लिहिस्तोवर घटनेची नोंद घेणे व पुढील कारवाई सुरू होती. घटनास्थळाला नगराध्यक्ष शेषराव ढोके, नगर परिषद गटनेते तथा शिक्षण सभापती फिरोज शेकुवाले, नगरसेवक सलीम गारवे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा तसेच कारंजा तहसिलचे नायब तहसिलदार महादेव आडे, मंडळाधिकारी देवानंद कटके यांनी भेट देवून माहिती घेतली.