टेलरिंग दुकानाला आग, तीन लाखांचे नुकसान
By admin | Published: November 14, 2015 02:17 AM2015-11-14T02:17:43+5:302015-11-14T02:17:43+5:30
आग लागल्यामुळे तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना
किन्हीराजा (जि. वाशिम): : येथील मुख्य चौकातील ब्रम्हा मेन्स वेअर या टेलरिंगच्या दुकानाला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान आग लागल्यामुळे तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी घडली. येथील मुख्य चौकात ब्रम्हानंद राठोड यांचे टेलरिंग दुकान गेल्या २0 वर्षांंपासून आहे. गुरुवारी रात्री दुकान बंद करून राठोड घरी गेले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ब्रम्हा मेन्स वेअरमधून धूर निघत असल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात येताच रोहिदास राठोड मिस्त्री, रमेश जामकर, भिका शेळके, गजानन शिंदे, महादेव हरणे यांनी दुकानाचे कुलूप तोडून आग आटोक्यात आणली तसेच साहित्य बाहेर काढले. तथापि, तीन शिलाई मशीन, टेबल-खुर्ची, टेलरिंग साहित्य, शिवलेले ५0 ड्रेस, शिलाई कापड, पंखा व दुकान असे एकूण तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. गेल्या २0 वर्षांंपासून राठोड यांचे दुकान या ठिकाणी असून, अचानक आग कशी लागली, याचा शोध पोलीस घेत आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे ब्रम्हानंद राठोड यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्यावर मोठे संकट कोसळले असून, महसूल विभाग, आमदार, खासदार यांनी त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. ब्रम्हा मेन्स वेअरला आग लागल्याची माहिती महसूल विभागाला मिळताच, मंडळ अधिकारी इंगळे, तलाठी गौरकर, जमादार राठोड यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. नेमकी ही आग अचानकपणे कशी काय लागली, याचा शोध पोलीस घेत आहेत. राठोड यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.