मुळाशी आग लावून झाडे पाडण्याच्या प्रकारात वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:42 PM2019-04-12T13:42:30+5:302019-04-12T13:42:35+5:30
राजूरा (वाशिम) : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मुळाशी आग लावून ती पाडण्याच्या प्रकारात हल्ली वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूरा (वाशिम) : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मुळाशी आग लावून ती पाडण्याच्या प्रकारात हल्ली वाढ झाली आहे. राजूरा ते रिधोरा यादरम्यानच्या रस्त्यावर असेच एक बाभुळचे झाड अवैधरित्या पाडण्यात आले असून ते गेल्या दोन दिवसांपासून तसेच रस्त्यावर पडून असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासकीय यंत्रणेचेही दुर्लक्ष होत आहे.
रस्त्याच्या कडेला नैसर्गिकरित्या वाढलेली बहुतांश ठिकाणची मोठमोठी झाडे रात्रीच्या सुमारास मुळाशी आग लावून पेटवून दिली जात आहेत. रात्रभर खालून जळणारी ही झाडे सकाळच्या सुमारास आपसूकच रस्त्यावर आडवी होत आहेत. यामाध्यमातून ग्रामीण भागात सक्रीय असलेल्या लाकूडतोड्यांचे फावत आहे. मात्र, रस्त्यावर पडणारी ही झाडे लवकरच बाजूला केली जात नसल्याने वाहतूकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणेने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.