वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचेच फटाके! सुरेश मापारी, वैभव सरनाईक, अशोक डोंगरदिवे, वैशाली लळे यांचा विजय
By संतोष वानखडे | Published: October 20, 2022 07:09 PM2022-10-20T19:09:45+5:302022-10-20T19:10:21+5:30
Washim News: बंडखोरीमुळे जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीची निवडणूक अविरोध करण्याचे मनसुबे धूळीस मिळाले असले तरी जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे.
- संतोष वानखडे
वाशिम - बंडखोरीमुळे जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीची निवडणूक अविरोध करण्याचे मनसुबे धूळीस मिळाले असले तरी जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. गुरूवारी (दि.२०) पार पडलेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे सुरेश मापारी, कॉंग्रेसचे वैभव सरनाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक डोंगरदिवे तर वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली लळे यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करीत विजय मिळविला.
जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२० मध्ये झाली होती. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या तिन्ही पक्षाने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन २०२० मध्ये सत्ता स्थापन केली होती. अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीने हाच फार्म्यूला कायम ठेवल्याने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे चक्रधर गोटे यांची अविरोध निवड झाली. चार विषय समित्यांच्या सभापती पदासाठी २० ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात निवडणुक पार पडली. समाजकल्याण समितीसाठी अशोक डोंगरदिवे (राकाॅं), श्याम बढे (भाजपा) व वनिता देवरे (वंचित बहुजन आघाडी) यांची उमेदवारी अर्ज भरले होते. यापैकी वनिता देवरे यांनी माघार घेतल्याने दोघांमध्ये थेट लढत झाली. डोंगरदिवे यांना ३६ तर बढे यांना १६ मते मिळाल्याने डोंगरदिवे यांना विजयी घोषित करण्यात आले. महिला व बालकल्याण समितीसाठी वैशाली लळे (वंचित), अश्विनी तहकिक (जनविकास), कल्पना राऊत (वंचित), लक्ष्मी लहाने (वंचित) व सुनिता कोठाळे (राकाॅं) यांनी अर्ज दाखल केले. कोठाळे व लहाने यांनी अर्ज मागे घेतल्याने उर्वरीत तीन उमेदवारांमध्ये लढत झाली. सर्वाधिक ३४ मते घेतल्याने लळे यांनी विजयी घोषित केले तर तहकिक (१६) व राऊत (२) यांचा पराभव झाला. दोन विषय समितीसाठी सुरेश मापारी (शिवसेना), वैभव सरनाईक (कॉंग्रेस), संध्या विरेंद्र देशमुख ( कॉंग्रेस बंडखोर), उमेश ठाकरे (भाजपा) यांच्यासह नंदाबाई डोफेकर, अश्विनी तहकिक, आशिष दहातोंडे, सुनिता कोठाळे अशा आठ जणांनी अर्ज भरले होते. यापैकी चार जणांनी माघार घेतल्याने मापारी, सरनाईक, देशमुख व ठाकरे यांच्यात लढत झाली. सर्वाधिक ३५ मते वैभव सरनाईक यांना तर सुरेश मापारी यांना ३४ मते मिळाल्याने या दोघांनाही विजयी घोषित करण्यात आले. संध्या देशमुख (१८) व उमेश ठाकरे (१७) यांचा पराभव झाला.