राज्यातील पहिले कृषी संकुल वाशिमध्ये साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:47 AM2021-08-17T04:47:08+5:302021-08-17T04:47:08+5:30
वाशिम : राज्यातील पहिले अद्ययावत बहुउद्देशीय कृषी संकुल वाशिम येथे साकारणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट ...
वाशिम : राज्यातील पहिले अद्ययावत बहुउद्देशीय कृषी संकुल वाशिम येथे साकारणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी या कृषी संकुलाचे ई-भूमिपूजन पार पडले.
कृषिमंत्री दादाजी भुसे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र वाशिम जिल्ह्याचे वचन दिले होते. ते त्यांनी वाशिम जिल्ह्याची निर्मिती करून पूर्ण केले. त्याच वाशिम जिल्ह्यात आज राज्यातील पहिल्या अद्ययावत बहुउद्देशीय कृषी संकुलाचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे, हा मोठा योगायोग आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. विकेल ते पिकेल या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बाजारपेठेत जे विकेल तेच पिकविण्यावर आपला भर राहणार आहे. एक जिल्हा, एक पीक या संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कृषिमंत्री भुसे म्हणाले, वाशिम येथे उभारण्यात येत असलेले स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुल एक पथदर्शी प्रकल्प ठरेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात याच धर्तीवर कृषी संकुलाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे भुसे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाविषयी माहितीचे व्हिडीओद्वारे सादरीकरण केले. आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी मानले.
०००००००
कृषी संकुलासाठी ५.४४ कोटींची तरतूद
वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून जिल्ह्यातील शेती निसर्गावर अवलंबून आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतीतील उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण मिळावे, त्याविषयीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५ कोटी ४४ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. या संकुलात रायपनिंग चेंबर, प्री-कुलिंग व शीतगृहाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. शेतमालाची प्रतवारी व पॅकिंग, शेतमाल विक्रीकरीता स्वतंत्र दालन, अद्ययावत प्रशिक्षण हॉल तसेच महिला व पुरुषांकरिता निवासाची स्वतंत्र व्यवस्था राहणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.