राज्यातील पहिले कृषि संकुल वाशिमध्ये साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 06:03 PM2021-08-16T18:03:41+5:302021-08-16T18:03:47+5:30
The first agricultural complex in the state will be set up in Vashim : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी या कृषि संकुलाचे ई-भूमिपूजन पार पडले.
वाशिम : राज्यातील पहिले अद्ययावत बहुउद्देशीय कृषि संकुल वाशिम येथे साकारणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी या कृषि संकुलाचे ई-भूमिपूजन पार पडले.
कृषिमंत्री दादाजी भुसे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र वाशिम जिल्ह्याचे वचन दिले होते. ते त्यांनी वाशिम जिल्ह्याची निर्मिती करून पूर्ण केले. त्याच वाशिम जिल्ह्यात आज राज्यातील पहिल्या अद्ययावत बहुउद्देशीय कृषि संकुलाचे भूमीपूजन माझ्या हस्ते होत आहे, हा मोठा योगायोग आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. विकेल ते पिकेल या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बाजारपेठेत जे विकेल तेच पिकाविण्यावर आपला भर राहणार आहे. एक जिल्हा, एक पीक या संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कृषिमंत्री भुसे म्हणाले, वाशिम येथे उभारण्यात येत असलेले स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल एक पथदर्शी प्रकल्प ठरेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात याच धर्तीवर कृषि संकुलाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे भुसे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाविषयी माहितीचे व्हिडीओद्वारे सादरीकरण केले. आभार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी मानले.