पंढरपूर यात्रेसाठी वाशिम आगारातून पहिली बस रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 04:07 PM2019-07-06T16:07:11+5:302019-07-06T16:09:45+5:30
पंढरपूर यात्रेसाठी वाशिम आगारातून पहिली बस रवाना झाली.
वाशिम : जगभरातील तमाम वारकऱ्यांचे दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायाच्या भेटीची अर्थात दर्शनाची आस लागलेले लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विविध मार्गांनी रवाना झालेले असतांनाच येथून पहिली एसटी बस यात्रेकरूंना घेऊन शनिवारी वाशिम आगारातून रवाना झाली. आषाढी एकादशी अवघ्या सहा दिवसावर आलेली असतांना तालुक्यातील वारकऱ्यांची पहिली बस वाशिम आगारातून सोडण्यात आली. कळंबा महाली येथील वारकऱ्यांच्या या बसला आज शनिवारी आगार व्यवस्थापक विनोद इलामे यांनी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर बसचे पूजन करून झेंडी दाखविली. यावेळी बसचे चालक व्ही.एन.तुरेराव, वाहक व्ही.पी.इंगळे, वाहतूक नियंत्रक दिलीपराव चव्हाण, वाहतूक निरीक्षक तेलगोटे, सहायक वाहतूक निरीक्षक शाम गावंडे, वाहन परिक्षक महाजन, राजगुरु, बळी, घुगे, वानखेडे, सुरेश मडके आदींचा सत्कार वारकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी कळंबा महालीचे माजी उपसरपंच तथा यात्रेकरू महादेवराव महाले, प्रकाश महाले, पोलीस पाटील गजानन महाले, राजेश महाले,माजी सैनिक प्रल्हादराव भालेराव, मधुकर महाले, नंदकिशोर महाले आदींची उपस्थिती होती.