आधी कोरोना चाचणी; नंतरच रेशनवर मिळणार धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 03:48 PM2021-05-09T15:48:07+5:302021-05-09T15:48:47+5:30
Washim News : आधी कोरोना चाचणी केली जाते व नंतरच धान्य देण्यात येत आहे.
धनज बु. : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धनज बु, येथे आधी चाचणी करा आणि नंतरच रेशनचे धान्य घ्या, असा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे गर्दी टळत असल्याचे दिसून येते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 'ब्रेक द चेन' मोहिमेंतर्गत नवीन नियमावलीची अंमलबजावणी केली जात आहे. कडक निर्बंध लागू झाले असून, या दरम्यान गोरगरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने पात्र लाभार्थींना मोफत धान्य वितरण सुरू केले आहे. धनज बु. येथे धान्य घेण्यासाठी गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वर्तविली जात होती. हे टाळण्यासाठी आधी कोरोना चाचणी करावी, त्यानंतरच धान्य घ्यावे, अशी सक्ती करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विनाकारण फिरणारे, परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणाºयांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वस्त धान्याचे वाटप सुरू असल्याने या ठिकाणीदेखील गर्दी होत आहे. ही गर्दी टाळणे आणि कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून धान्य घेण्यासाठी येणाºया प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदाराने घेतला असून, आरोग्य विभागाच्या सहकार्यातून कोरोना चाचणी केली जात आहे. यामुळे गर्दी ओसरल्याचे दिसून येते.