उमेदवारी अर्जाचा पहिला दिवस ‘निरंक’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:57 PM2017-09-15T19:57:13+5:302017-09-15T19:57:56+5:30
वाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याला १५ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवार अर्ज तहसील कार्यालयात दाखल झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याला १५ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवार अर्ज तहसील कार्यालयात दाखल झाला नाही.
ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणाºया ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर दिग्गजांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली. आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केलेला आहे. मात्र, कारंजा तालुक्यातील चार व मंगरूळपीर तालुक्यातील १० अशा १४ ग्रामपंचायतींची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने आता २७३ ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज सादर करण्याला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा अशा सहा तहसील कार्यालयात एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही.
दरम्यान, उमेदवाराला उमेदवारी अर्ज सादर करताना शक्तीप्रदर्शन करणे किंवा मिरवणुक काढत अर्ज दाखल करणे महागात पडू शकते. अर्ज दाखल करताना उमेदवाराला तीन किंवा तीनपेक्षा अधिक व्यक्ती सोबत नेल्यास आचारसंहितेचा भंग ठरणार आहे. त्यामुळे अर्ज दाखल करताना इच्छूक उमेदवाराला सतर्कता बाळगावी लागणार आहे.