२७ जूनला सर्व शाळांची पहिली घंटा !
By admin | Published: June 19, 2017 01:44 PM2017-06-19T13:44:59+5:302017-06-19T13:44:59+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच खासगी व इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा एकाच दिवशी अर्थात २७ जूनपासून सुरू कराव्या, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिल्या.
वाशिम : पालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच खासगी व इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा एकाच दिवशी अर्थात २७ जूनपासून सुरू कराव्या, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिल्या.
उच्च न्यायालयाचा ८ जून २००७ चा निर्णय तसेच २२ जून २००७ च्या शासन आदेशात स्पष्ट आहे की विदर्भातील सर्व शाळा या एकच दिवशी २६ जून ला उघडण्यात याव्या. यावर्षी २६ जून रोजी ह्यरमजानह्णची सुट्टी असल्याने २७ जूनपासून स्थानिक स्वराज्य संस्थेसह सर्व खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होणे अपेक्षीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळा २७ जूनला सुरू होतात. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळा २७ जूनपूर्वीच सुरू होतात, हा दरवर्षीचा अनुभव आहे. यासंदर्भात मालेगाव तालुक्यातील शिक्षक व मुख्याध्यापक संघाने शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवून सर्व शाळा २७ जूनपासून सुरू कराव्या, अशी मागणी केली होती. इंग्रजी मध्यमाच्या शाळा या जून महिन्यातील कोणत्याही तारखेपासून भरविण्यात येत आहेत. वेगवेगळ्या तारखेला शाळा सुरू होत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळा लवकर सुरू होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या रोषाला शिक्षक व मुख्याध्यापकांना बळी पडावे लागते. म्हणून इंग्रजी माध्यमाच्या संस्थांनीदेखील २७ जूनपासून शाळा सुरू कराव्या, अशा सूचना मानकर यांनी दिल्या. २७ जूनपूर्वी कुणी शाळा सुरू करीत असेल तर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारादेखील मानकर यांनी दिला.