पहिल्याच पावसात रिसोडातील रस्त्यांची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:43 PM2019-06-10T13:43:45+5:302019-06-10T13:43:50+5:30
रिसोड (वाशिम) : पहिल्याच पावसात रिसोड शहरातील प्रमुख रस्त्यांची वाट लागली असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : पहिल्याच पावसात रिसोड शहरातील प्रमुख रस्त्यांची वाट लागली असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. खड्डे बुजविण्याची मागणी शहरवासियांमधून होत आहे.
रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मार्ग प्रमुख असून, याच मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या मार्गावरील अलाहाबाद बँकेसमोर रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. तसेच पेट्रोल पंपावरील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. बसस्थानक ते लोणी फाटा मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरही खड्डे पडले आहेत. रिसोड शहरात ८ जून रोजी रात्री ११ वाजतादरम्यान मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने रस्त्यांवर सर्वत्र पाणी साचले. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी शहरवासियांमधून होत आहे.