वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिला विलगीकरण कक्ष शेलूबाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 11:32 AM2021-05-26T11:32:40+5:302021-05-26T11:32:56+5:30
Washim News : जिल्ह्यात शेलूबाजार येथील ग्रामपंचायतने प्रथमच गावस्तरावर विलगीकरण कक्ष स्थापन केला
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार : स्थानिक ग्रामपंचायतने जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात शेलूबाजार येथील ग्रामपंचायतने प्रथमच गावस्तरावर विलगीकरण कक्ष स्थापन केला. या कक्षाचे उद्घाटन २५ मे रोजी उपविभागिय अधिकारी सखाराम मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामपंचायतच्यावतीने विलगीकरण कक्ष जिल्ह्यात प्रथमतः निर्माण करण्याचा बहुमान शेलूबाजारला मिळविला. यावेळी तहसीलदार नरसय्या कोडागुरले, गटविकास अधिकारी हरिनारायण परिहार, गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद भगत, डॉ. प्रशांत महाकाळ भगत, जि.प.सदस्य दौलत इंगोले, पांडुरंग कोठाळे, रामराव इंगोले, पं.स. सदस्य सचिन राऊत, गणेश पवार, सरपंच प्रमिला पवार, ग्रामविकास अधिकारी सीमा सुर्वे, ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी मुळे यांनी ग्रामपंचायतीने हा कक्ष उभारल्याने सरपंच, सचिव व ग्रामपंचायतीची प्रशंसा करत फारशी लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णाला या विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. विलगीकरण कक्ष व तिथे राहणाऱ्या रुग्णांसाठी सोयीसुविधांची पाहणी उपविभागीय अधिकारी मुळे यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन पांडुरंग कोठाळे यांनी केले.