कोरोनाच्या सावटाखाली वाजली शाळेची पहिली घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 03:44 PM2020-11-24T15:44:58+5:302020-11-24T15:45:13+5:30
८२१५१ पैकी ३४२५ विद्यार्थ्यांची तर २५५१ पैकी ८२२ शिक्षकांची हजेरी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या सावटाखाली सोमवार, २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, शाळेचा पहिला दिवस धाकधुकीचा ठरला. ३६३ पैकी केवळ १४३ शाळांची पहिली घंटा वाजली असून, ८२१५१ पैकी ३४२५ विद्यार्थ्यांची तर २५५१ पैकी ८२२ शिक्षकांची हजेरी होती.
यंदा मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. आॅक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्याच्या २३ तारखेला शाळेची पहिली घंटा वाजली. कोरोनाच्या सावटाखाली शाळेचा पहिला दिवस कसा राहिल, याची उत्सुकता तसेच धाकधुकही सर्वांनाच होती. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाºया ३६३ शाळा असून, येथे ८२ हजार १५१ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत २५५१ शिक्षक आणि १६६८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची कोरोना चाचणी केली जात आहे. आतापर्यंत २३८२ शिक्षक आणि ८४३ शिक्षकेतर कर्मचाºयांची चाचणी झाली असून, यापैकी २९ शिक्षक आणि दोन शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ३१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाचे सावट असल्याने आणि पूर्ण तयारी झाली नसल्याने पहिल्या दिवशी ३६३ पैकी १४३ शाळा सुरू झाल्या तर ८२१५१ पैकी ३४२५ विद्यार्थी उपस्थित होते. ८२२ शिक्षकांची पहिल्या दिवशी उपस्थिती होती. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळेत एका बेन्चवर एक विद्यार्थी बसविण्यात आला तसेच तपासणी करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. प्रार्थनेच्या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर दिसून आला. चार तासिकांसाठी वर्ग सुरू राहत असून, यामध्ये प्राधान्यक्रमाने इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकविण्यात आला. पहिल्या दिवशी ७२९० पालकांनी संमतीपत्र दिले.