पाच कोटींची पेयजल योजना नेहमीच लिकेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:13+5:302021-07-04T04:27:13+5:30
पाच वर्षांपूर्वी नादुरुस्त व तोकड्या स्वरूपाचा पाणीपुरवठा योजनांमुळे शिरपूर येथे मोठी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. याची दखल घेऊन ...
पाच वर्षांपूर्वी नादुरुस्त व तोकड्या स्वरूपाचा पाणीपुरवठा योजनांमुळे शिरपूर येथे मोठी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. याची दखल घेऊन तत्कालीन जि.प. सदस्य ईमदाद बागवान यांनी पाठपुरावा केल्याने शासनाने ४.८९ कोटी रुपये राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत मंजूर केले होते. सन २०१२ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले. तीनचार वर्षांत योजना पूर्ण झाली. गावाला स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळयोजनेच्या कामाने गावातील पाणीटंचाई संपुष्टात आली. मात्र, या योजनेतील पाइपलाइन ठिकठिकाणी नियमितपणे लिकेज होत आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी गावकऱ्यांना मिळत नाही. तसेच लिकेज दुरुस्त करण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड ग्रामपंचायतीला पडत आहे. ग्रामपंचायतीला ही योजना खर्चाला काळ ठरत आहे. तर, शिरपूरवासीयांची शुद्ध पाण्याची समस्या कायम राहत आहे.
पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय
शिरपूर येथील राष्ट्रीय योजनेमुळे गावात पाणीपुरवठा नियमित होतो; परंतु वारंवार होणाऱ्या लिकेजमुळे नळयोजनेद्वारे मिळणारे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. योजनेची पाइपलाइन ठिकठिकाणी लिकेज होत आहे. ही बाब ग्रामपंचायतीसाठी खर्चिक ठरत आहे. लिकेजमुळे पाण्याची नासाडीसुद्धा होते.