पाच दिवस वनविभागाला नाही दिसले जखमी माकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:40 AM2021-01-25T04:40:59+5:302021-01-25T04:40:59+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथे ५ दिवसांपूर्वी एका माकड अपघातात गंभीर जखमी झाले. त्यात माकडाचा एक पाय मोडला आणि शरीरावर ...
मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथे ५ दिवसांपूर्वी एका माकड अपघातात गंभीर जखमी झाले. त्यात माकडाचा एक पाय मोडला आणि शरीरावर गंभीर जखमाही झाल्या होत्या. तपोवन येथील गोरख येवले यांना हे माकड शेत शिवारात अत्यंत गंभीर अवस्थेत दिसले. त्यांनी या घटनेची माहिती निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या वनोजा शाखेचे सदस्य, वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयातील आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला दिली. त्यावरून ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पर्यावरण अभ्यासक गौरव कुमार इंगळे व वनविभागाला ही माहिती दिली. प्रत्यक्षात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही घटना आधीच कळणे आवश्यक होते, परंतु माहिती देऊनही वनविभागाचा कोणताही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. त्यामुळे वन्यजीवप्रेमींनी या माकडास उपचारासाठी शेलूबाजार येथील पशुंच्या दवाखान्यात नेले. येथे पशुचिकित्सक डॉ.घुगे यांनी माकडावर उपचार केले, परंतु गंभीर जखमी झाल्याने आणि उपचारास विलंब झाल्याने माकडाचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.