वाशिम जिल्ह्यातील पाच शाळा होणार ‘आदर्श’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:48 PM2020-10-30T12:48:22+5:302020-10-30T12:48:28+5:30
Washim News जिल्ह्यातील एकूण पाच शाळांची निवड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढविण्याबरोबरच या शाळांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला असून, त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकूण पाच शाळांची निवड करण्यात आली.
खासगी शाळेच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा टिकण्यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता शिक्षण विभागाने ‘आदर्श शाळा’ हा उपक्रम हाती घेतला असून, या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या टिकवून ठेवणे, किंबहुना यामध्ये वाढ करणे, या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धीक व मानसिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातून एक शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित केली जाणार आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा शाळांची निवड होणे अपेक्षीत होते. परंतू, मालेगाव तालुक्याला डच्चू देत उर्वरीत पाच तालुक्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे पाच शाळांची निवड करण्यात आली. ६ नोव्हेंबरपर्यंत निवडलेल्या शाळांची पुष्टी करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. दप्तराच्या ओझ्यापासून विद्यार्थ्यांची एका दिवसासाठी मुक्तता व्हावी म्हणून दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम आदर्श शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)