वाशिम नगर परिषदेचे पाच कर्मचारी क्वारंटीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:34 AM2020-05-07T11:34:09+5:302020-05-07T11:34:16+5:30
४ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तर एका जणाला होम क्वारंटाईन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम:उत्तरप्रदेशमधील एका ट्रक क्लिनरच्या मृतदेहावर ४ मे रोजी दुपारी २ वाजता नगरपरिषदेमधील आरोग्य निरिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केलेत. यात सहभागी कर्मचाऱ्यांपैकी ४ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तर एका जणाला होम क्वारंटाईन करण्यात आले. या कर्मचाºयांना क्वारंटाईन करण्यात आल्याने विविध चर्चा रंगतांना दिसून येत आहेत.
वाशिम येथे पार पडलेल्या अंत्यसंस्कारावेळी केवळ नगरपरिषदेतील चार कर्मचारी व एक आरोग्य निरिक्षकांनीच अंत्यसंस्कार केलेत. यावेळी आरोग्य विभागातील जबाबदार कोणीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातून देण्यात आलेल्या मृतदेहाला व्यवस्थित बांधणी करण्यात आला नसल्याचा आरोप वाशिम नगरपरिषदेचे अध्यक्ष अशोक हेडा व काही कर्मचाºयांनी केला होता.
तर याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी सर्व सोपस्कार पूर्ण करुन नगरपरिषद कर्मचाºयांकडे मृतदेह दिला असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले होते. यावर आता नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी प्रश्न उपस्थित करुन जर मृतदेह देतांना सर्व सोपस्कार पूर्ण केले होते तर मग या कर्मचाºयांना क्वारंटाईन का करण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. दररोज आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कोरोना रुग्णांच्या संपर्कात येतात . त्याबाबत खबरदारी घेऊन उपचार केल्या जातात. न.प. कर्मचारी यांना सुध्दा जिल्हा शल्य चिकित्सकांनी पीपीटी कीट, मृतदेहाला व्यवस्थित गुंडाळून दिले तर कर्मचाºयांना मग क्वारंटाईन करण्यामागचे कारण काय ?
- अशोक हेडा
अध्यक्ष, नगरपरिषद वाशिम
त्या कमचाºयांना क्वारंटाईन करण्याची तशी आवश्यकता नाही, परंतु खबरदारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सुचनेवरुन कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाºया कर्मचाºयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये ४ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तर एका जणाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या कर्मचाºयांना क्वारंटाईन झालेच पाहिजे असे नाही त्यांच्या भीतीपोटीच त्यांना क्वारंटाईन करण्यात आले.
-डॉ. अंबादास सोनटकके
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम