पाच गावांनी रात्र काढली अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:02 AM2017-08-12T02:02:46+5:302017-08-12T02:02:54+5:30
आसोला खुर्द: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्दसह परिसरात १0 ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे पाच गावातील ग्रामस्थांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. या गावांत तब्बल १७ तास वीजपुरवठा खंडित होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसोला खुर्द: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्दसह परिसरात १0 ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे पाच गावातील ग्रामस्थांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. या गावांत तब्बल १७ तास वीजपुरवठा खंडित होता.
सविस्तर असे की मौजे आसोला खुर्दसह परिसरात वादळ, वारा, पाऊस नसताना अचानक १0 ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाला काही वेळाने वीजपुरवठा सुरळीत होईल असे वाटत असताना; मात्र वीज पुन्हा आलीच नाही त्यामुळे रात्रभर विजेच्या लपंडावामुळे अतोनात नागरिकांना त्रास सहन कारवा लागला आसोला खुर्दसह परिसरातील हातोली आमदरी, शिवणी, वसंतनगर तांडा, आदी पाच गावाला रात्रभर खंडित वीजपुरवठय़ाचा फटका सहन करावा लागला.
तब्बल १७ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा बंद राहिल्याने पाणीपुरवठा, पीठ गिरणी, टीव्ही, मोबाइल, पंखे, फ्रीज आदीसह विजेवर चालणारी सर्वच उपकरणे बंद पडल्याने जनजीवन प्रभावित झाले होते. त्यातच दिवसभर राबराब राखून शेतात घाम गाळून आलेला शेतकरी सायंकाळी विश्रांती घेण्याच्या मन:स्थितीत असतो; परंतु सतत सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे डासांसह उकाड्याच्या त्रासात रात्र जागून काढण्याची पाळी ग्रामस्थांवर आली आहे. वीजपुरवठय़ाअभावी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने वृद्ध व बालकांना आजारांची लागण होत असून वीज वितरण कंपनीच्या उदासीन कारभरापायी पाच गावांवर रात्रीच्या विजेच्या लपंडावाचा सामना करण्याची वेळ येत असल्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी संबंधित कर्मचारी आणि अभियंत्यांकडे चौकशी करून माहिती ुदेण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यास त्यांच्याशी संपर्कही होत नाही. त्यामुळे वीज वितरणच्या संबंधित उपकेंद्रावरील लॅण्डलाइनवर संपर्क केल्यास लाइन व्यस्त असल्यामुळे संपर्क होऊ शकत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची दखल वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घ्यावी आणि संबंधित गावातील लाइनमनला मुख्यालयी राहण्याच्या सूचना कराव्यात, तसेच पाच गावांमधील वीजपुरवठा १७ तास खंडित राहिल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वच संबंधित गावातील लोक करीत आहेत.
आसोलासह परिसरातील गावांत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कर्मचार्यांनी काही ठिकाणी पाहणीही केली; परंतु रात्रीच्या वेळी नेमका कोठे बिघाड झाला, हे कळणे कठीण झाले होते. परिसरातील सर्वच ठिकाणच्या रोहित्रासंह इतर तांत्रिक बाबींची पाहणी करून वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण शोधू आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही. यासाठी उपाययोजना करू.
- जे. एस. दामोदर
सहायक अभियंता, मानोरा ग्रामीण २