करदात्या महिलेकडून होणार ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:36+5:302021-08-13T04:47:36+5:30
मालेगांव : ध्वजारोहणाचा मान सहसा सरपंचाचा असतो, मात्र स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त ढोरखेडा या गावात ध्वजारोहण करण्यासाठी दरवर्षी ...
मालेगांव : ध्वजारोहणाचा मान सहसा सरपंचाचा असतो, मात्र स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त ढोरखेडा या गावात ध्वजारोहण करण्यासाठी दरवर्षी नवीन योजना आणल्या जातात. यावर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कर भरणाऱ्या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे ग्रामपंचायतने ठरविले आहे.
स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त ढोरखेडा हे गाव दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कधी स्वातंत्र्य सैनिकाच्या हस्ते, कधी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या हस्ते, कधी शाळेतून प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते, कधी महिलांच्या हस्ते, असे वेगवेगळ्या पुरुष आणि महिलांना स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवण्याची संधी ढोरखेडा ग्रामपंचायतकडून देण्यात येते. यावर्षी २०२१-२२ या आर्थिक वर्षातील पहिला दिवस १ मार्चला ज्या महिलेने सर्वप्रथम कर भरला. त्या महिलेला हा सन्मान दिला जाणार आहे. ढोरखेडा या गावची कर वसुली शंभर टक्के असते. मागील धोरणाचा काळ वगळता आतापर्यंत ती १०० झाली आहे. मागच्या २०-२१ या आर्थिक वर्षात कोरोनामुळे ती वसुली ८० टक्के पर्यंत पोहोचली आहे. ग्रामपंचायतीच्या या वेगवेगळ्या योजनांमुळे अनेक नागरिकही गावाच्या विकासासाठी सहकार्य करत असल्याचे दिसते. यावर्षी झेंडावंदन करता सुमन भगवान वाळले यांना हा मान देण्यात आला आहे.