वाशिमच्या ‘एकबुर्जी’ प्रकल्पावर ‘फ्लेमिंगो’चे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 04:21 PM2018-12-12T16:21:08+5:302018-12-12T16:21:15+5:30
वाशिम : वाशिम शहरापासून जवळच असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावर परदेशी पाहुणे; अर्थात 'फ्लेमिंगो' उर्फ रोहित पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षीप्रेमींचे पाय प्रकल्पाच्या दिशेने पडत आहेत.
- नंदकिशोर नारे
वाशिम : वाशिम शहरापासून जवळच असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावर परदेशी पाहुणे; अर्थात 'फ्लेमिंगो' उर्फ रोहित पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षीप्रेमींचे पाय प्रकल्पाच्या दिशेने पडत आहेत.
राज्यातील काही भागात सध्या फ्लेमिंगोचे वास्तव्य आढळत असून साधारणत: ३० ते ३५ पक्षांचा एका थवा एकबुर्जी प्रकल्पावर नुकताच दाखल झाला आहे. विदर्भात एवढ्या मोठ्या संख्येने केवळ एकबुर्जी प्रकल्पावरच ‘फ्लेमिंगो’ पक्षी आढळून येतात. गुजरातमधील कच्छ येथून फ्लेमिंगो हे एकबुर्जी जलाशयावर आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत दाखल होत असतात. यावर्षी फ्लेमिंगोचे आगमन लांबणीवर पडल्याने पक्षीप्रेमींची काहीशी निराशा झाली होती. त्यांच्या आगमनाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत असताना, मागील सात, आठ दिवसांपासून एकबुर्जीच्या पाणलोट क्षेत्रात फ्लेमिंगो दाखल झाल्याने पक्षी प्रेमींत उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते.
लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही संबोधले जाते. मोठ्या संख्येने पक्षी दाखल झाल्यावर त्यांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद ठरतात व भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो. थंडीचे प्रमाण वाढल्यास महिनाभरात आणखी पक्षी दाखल होऊन 'फ्लेमिंगो'च्या आणखी सुंदर 'कवायती' पाहायला मिळतील, अशी अपेक्षा पक्षीप्रेमी दीपक जोशी यांनी व्यक्त केली.
या ठिकाणी अनेकविधं जातीची बदके, करकोचा, पाणकावळे, चिखले पाकोळ्या, झुडूपी स्थलांतरीत पक्षी, हिवाळ्यातच येणारे हॅरिअर, आॅस्प्रे, ससाणे आदी पक्ष्यांचे नंदनवन म्हणून एकबुर्जी प्रकल्प ओळखला जातो. विविध जातींचे पक्षी दाखल झाल्याने एकबुर्जी परिसर चांगलाच बहरून गेला आहे. पश्चिम वºहाडातील पर्यटकांसाठी एकबुर्जी प्रकल्पावर पक्षी पाहण्याची ही अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.
वाशिमचे माजी मानद वन्यजीव रक्षक प्रशांत जोशी, पक्षीमित्र योगेश जोशी, प्रवीण जोशी यांच्यासह दीपक जोशी यांनी एकबुर्जी प्रकल्पात या पक्ष्यांचे निरीक्षण केले आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी संरक्षण पुरविण्याची मागणीही पक्षप्रेमींनी केली. एकबुर्जी प्रकल्प हा विदर्भातील पक्षमित्र, पक्षीप्रेमींसाठी एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.
गुजरातमधील कच्छ येथून फ्लेमिंगो पक्षी हा एकबुर्जी प्रकल्प येथे स्थलांतरण करीत असतो. एवढ्या मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी विदर्भातील एकमेव एकबुर्जी प्रकल्पावर दाखल होत असतो. दरवर्षी साधारणत: नोव्हेंबर महिन्यात दाखल होणारा हा पक्षी यावर्षी डिसेंबर महिन्यात दाखल झाला. सध्या ३० ते ३५ पक्ष्यांचा थवा असून, थंडी वाढल्यानंतर फ्लेमिंगोचे प्रमाण आणखी वाढू शकेल. फ्लेमिंगोची शिकार होणार नाही, या दृष्टिने प्रशासनासह सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे.
- दीपक जोशी
पक्षीमित्र