सुजलाम, सुफलाम अंतर्गत ३१५ हेक्टरवर समतल चर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:08 PM2018-12-02T13:08:37+5:302018-12-02T13:09:50+5:30
जिल्ह्यात सहा तालुक्यात मिळून एकूण ३१४.१५ हेक्टर क्षेत्रावर खोल व साधारण समतल चर या प्रकारातील जलसंधारणाची कामे वेगाने करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुजलाम्, सुफलाम् अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात सहा तालुक्यात मिळून एकूण ३१४.१५ हेक्टर क्षेत्रावर खोल व साधारण समतल चर या प्रकारातील जलसंधारणाची कामे वेगाने करण्यात येत आहेत. यातील ५१ हेक्टर क्षेत्रातील कामेही पूर्ण झाली आहेत.
पाणीटंचाई या समस्येवर कायम मात करून राज्यात जलक्रांती घडविण्यासाठी राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुजलाम्, सुफलाम् अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिमचाही समावेश असून, या अभियानाद्वारे जलसंधारणाची कामे करण्यासाठी बीजेएसकडून जेसीबी आणि पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहेत, तर प्रशासकीय विभागाच्या यंत्रणेकडून जलसंधारणाची कामे करून घेण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यात या अभियानातून ४६ शेततळी, ३ वनतळी, तसेच ३१४.८६ हेक्टर क्षेत्रात समतल चर खोदण्यात येत आहेत. समतल चर खोदण्यासाठी बीजेएसकडून २१ जेसीबी उपलब्ध करण्यात आल्याने ही कामे वेगाने सुरू होऊन त्यांनी मानोरा तालुक्यातील पिंप्री येथील ३१.४९ हेक्टर क्षेत्रावर, तसेच मंगरुळपीर तालुक्यातील जोडगव्हाण येथे २० हेक्टर क्षेत्रात खोल समतल चराचे कामही पूर्ण करण्यात आले आहे, तर कारंजा तालुक्यातील मोखड, खतनापूर, मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर, मालेगाव तालुक्यातील पांगरी धनकुटे, तसेच वाशिम तालुक्यातील घोटा, सोंडा, वार्ला आणि धुमका येथील खोल समतल चरांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्याशिवाय मानोºयातील सोमनाथ नगर, मंगरुळपीर तालुक्यातील चांभई, पिंपळखुटा आणि मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील शेततळ्यांचे कामही वेगाने करण्यात येत आहे.