आता रोजगार हमी योजनेंतर्गत बहरणार फुलशेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:36 AM2020-12-16T11:36:00+5:302020-12-16T11:38:27+5:30

Washim News गुलाब, मोगरा, निशिगंधच्या फुलांची लागवड केली जाणार आहे.

Flower cultivation will now flourish under MNREGA | आता रोजगार हमी योजनेंतर्गत बहरणार फुलशेती

आता रोजगार हमी योजनेंतर्गत बहरणार फुलशेती

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा कृषी विभागाने ही मोहीम राबविण्याची तयारी केली आहे. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. 

 लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्याच्या कृषी विभागाने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात सलग फूल पिकांची लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, वाशिम जिल्हा कृषी विभागाने ही मोहीम राबविण्याची तयारी केली आहे. यात गुलाब, मोगरा, निशिगंधच्या फुलांची लागवड केली जाणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गुलाब, मोगरा व निशिगंध या फुलझाडांची लागवड करण्यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरून वारंवार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या रोहयो विभागाने १ ऑक्टोबर २०२०, काढलेल्या पत्रानुसार मनरेगा आयुक्तांनी ५ ऑक्टोबर २०२० रोजी, तसेच ११ नोव्हेंबर रोजी संबंधित स्तरावर पत्रव्यवहार केल्यानंतर राज्यात रोहयोंतर्गत फूल पिकांची लागवड करण्याच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. 
यानुसार फलोत्पादन संचालकांमार्फत रोहयोंतर्गत वैयक्तिक लाभार्थींच्या सलग शेतावर गुलाब, मोगरा व निशिगंध या पिकांची लागवड करण्यासह या फूल पिकांचे आर्थिक मापदंड, मजुरी दर, प्रतिमनुष्य दिन २३८ या प्रमाणे तयार करून नरेगा आयुक्त नागपूर यांच्याकडून प्रस्तावाला मान्यताही देण्यात आली. यानुसार वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून निकषानुसार अर्ज मागवून ही प्रक्रिया राबविण्याची तयारी करण्यात आली आहे.  

९ प्रवर्गातील कुटूंब, शेतकऱ्यांना लाभ
रोहयोंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फुलशेती कार्यक्रमाचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटूंबे, महिला प्रधान कुटूंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटूंबे, भू-सुधार योजनेचे लाभार्थी किंवा इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्तींना घेता येणार आहे. 


हेक्टरी २ लाख रुपये अनुदान
फुलशेती योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या प्रवर्गातील पात्र लाभार्थींना फुलपिकांच्या लागवडीसाठी हेक्टरी २ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासाठी इच्छूक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक असून, ही जमीन कुळकायद्याखाली येत असल्यास आणि  ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास योजना कुळाच्या संमतीने राबविली जाणार आहे.


कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार पुढील हंगामात फुलपिकांची लागवड करण्यासाठी १ जून ते ३० नोव्हेंबरदरम्यान निश्चित प्रवर्गातील लाभार्थींकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या शेतात गुलाब, मोगरा, निशीगंध या फुलांची लागवड केली जाणार आहे.
-शंकरराव तोटावार. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Flower cultivation will now flourish under MNREGA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.