पारंपरिक पिकांना फाटा देत फुलविली फळबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:36 AM2021-01-18T04:36:55+5:302021-01-18T04:36:55+5:30
मानोरा : रब्बी आणि खरीप हंगामातील पारंपरिक पिकांना फाटा देत तालुक्यातील आसोला खु. येथील शेतकरी महादेव सरोदे यांनी आपली ...
मानोरा : रब्बी आणि खरीप हंगामातील पारंपरिक पिकांना फाटा देत तालुक्यातील आसोला खु. येथील शेतकरी महादेव सरोदे यांनी आपली शेती पूर्णत: फळबाग लागवडीखाली आणली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शेतातील द्राक्ष व संत्र्यांची झाडे फळांनी लदबदली असून, विक्रमी उत्पन्न होण्याची अपेक्षा त्यांनी वर्तविली आहे.
डोंगराळ भागात असलेल्या आसोला खु. येथील शेतकरी महादेव सरोदे यांनी दहा एकर शेतात संत्र्याची बाग फुलविली आहे. त्यापैकी १२०० झाडांना यावर्षी मृगबहार आलेला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये संत्रा संकटात असल्याने सरोदे यांच्या शेतातील संत्रा विकत घेण्यासाठी व्यापाऱ्यांची वर्दळ सुरू आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संत्रा काढायला येऊ शकतो. साधारणत: १०० ते ११० टन उत्पादन होईल, असे संकेत व्यापाऱ्यांनीच वर्तविले आहेत. ४३ हजार रुपये प्रतिटन या दराने व्यापाऱ्यांकडून संत्र्याला मागणी आली आहे. यासह सरोदे यांच्या शेतात चमन व सुपर सोनाका या प्रजातीच्या द्राक्षांची झाडे असून, त्यालाही फळे लदबदल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या प्रयोगशीलतेचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
.....................
मी सोयाबीन, तूर, कपाशी यापैकी कुठलेही पीक घेत नाही. या पारंपरिक पिकांना फाटा देत संपूर्ण शेती फळबाग लागवडीखाली आणली आहे. शेतात सध्या सीताफळाची ११०० झाडे, पेरूची १०६० झाडे, लिंबूची २५० झाडे असून, मोसंबीच्या १००० झाडांची लागवड करणे सुरू आहे. याशिवाय द्राक्षांची झाडेही सुस्थितीत उभी आहेत.
महादेव सरोदे
शेतकरी, आसोला खु.