वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा - खडसे
By admin | Published: August 19, 2015 01:45 AM2015-08-19T01:45:07+5:302015-08-19T01:45:07+5:30
मदत कार्य व पुनर्वसन, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामाचा घेतला आढावा.
वाशिम : चारा निर्मितीसाठी राज्य शासनाने हाती घातलेला गतिमान वैरण विकास कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त चारा निर्मिती करण्यावर भर देण्याच्या सूचना महसूल, कृषी व फलोत्पादन मंत्नी एकनाथ खडसे यांनी दिल्या. पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना खडसे यांनी १८ ऑगस्टला वाशिम शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक विनिता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, कृषी उपसंचालक सचिन कांबळे यांच्याकडून महसूल, कृषी व फलोत्पादन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ, मदत कार्य व पुनर्वसन, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी माजी आमदार विजय जाधव, तहसीलदार आशीष बिजवल उपस्थित होते. यावेळी खडसे म्हणाले की, राज्याच्या काही भागात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन क्षेत्नातील चारा टंचाईग्रस्त भागात पाठवण्याबाबत शासन विचार करीत आहे. त्याचबरोबर गतिमान वैरण विकास कार्यक्रमांतर्गत कमी कालावधीत तयार होणार्या चार्याची लागवड करून जिल्ह्यात जास्तीत जास्त चारा निर्मिती करण्याबाबत कृषी विभागाने प्रयत्न करावा, असे खडसे म्हणाले. जिल्हाधिकारी द्विवेदी व पोलीस अधीक्षक साहू यांच्याकडून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. आगामी गणेशोत्सव व दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या व जिल्ह्यातील संवेदनशील शहरांमधील गर्दीच्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांच्याकडून जिल्ह्यात सुरु असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या कामाचा आढावा घेतला; तसेच ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत निर्देश दिलेत.