अवकाळी पावसामुळे यंदा उद्भवणार चाराटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:27 PM2019-11-17T15:27:56+5:302019-11-17T15:28:03+5:30
रब्बी ज्वारीच्या पेरणीवर भर देण्याची गरज असल्याचे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले असून, या पिकातून गुरांसाठी मिळणारे कुटारही नष्ट झाले आहे. त्यात खरीप हंगामात ज्वारीची पेरणी कमी होते. त्यामुळे पुढील काळात चाऱ्याची समस्या गंभीर होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात चारापिकांवर प्रामुख्याने रब्बी ज्वारीच्या पेरणीवर भर देण्याची गरज असल्याचे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून खरीप ज्वारीसह इतर तृणधान्याच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. प्रामुख्याने ज्वारी, बाजरीचे क्षेत्र आता नावापुरतेच राहिले आहे. त्यातच कपाशीचे क्षेत्रही घटल्याने गुरांच्या चाºयाचा प्रश्न सतत पशूपालकांना भेडसावत आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिेले असले तरी, शेतकरी ज्वारीच्या पेºयावर भर देण्याची शक्यता कमीच आहे. वन्यप्राण्यांचा त्रास बाजारात अपेक्षेच्या तुलनेत मिळणारे कमी दर आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी ज्वारीसह इतर चारा पिकांकडे पाठ करीत आहेत.
ज्वारी, बाजरीचा पेरा घटल्याने कडबा मिळणे कठीण आहे. तर कपाशीचा पेरा घटल्याने सरकी, सरकी ढेपेचे दर गगनाला भिडले आहेत. अशात गुरांच्या चाºयासाठी सोयाबीनच्या कुटाराचा मुख्य आधार पशूपालक आणि शेतकरीवर्गाला मिळाला होता. जिल्ह्यात हिवाळ्याच्या मध्यंतरापासून हिरवा चारा नष्ट झाल्यानंतर या कुटारावरच गुरांचे भरणपोषण करण्यावर भर दिला जातो. आता यंदा अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. त्यात प्रामुख्याने सोयाबीनच्या शेंगा आणि झाडे पावसाने कुजल्याने कुटार उपलब्ध होण्याची शक्यताच मावळली आहे. त्यात ज्वारीच्या पिकाचा पेरा नावापुरताच असून, इतर चारापिकेही शेतकºयांना घेता आली नाहीत. त्यामुळे यंदा हिवाळा अखेरपासून जिल्ह्यात पशूंच्या चाºयाचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार आहे. या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवायचे असेल, तर शेतकºयांना यंदाच्या हंगामात रब्बी ज्वारीसह इतर चारा पिकांवर भर देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, कृषी विभागानेही यंदा सरासरी क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीच्या पेरणीचे नियोजन वाढविले असून, गळीत धान्याचा पेरा वाढविण्यावरही कृषी विभागाकडून भर देण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या या प्रयत्नांना शेतकºयांचा प्रतिसाद लाभला किंवा चाराटंचाईची तिव्रता लक्षात आली, तरच जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाईवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असे मत कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनीही व्यक्त केले आहे.