मराठा आरक्षणासाठी वाशिममध्ये अन्नत्याग सत्याग्रह
By संतोष वानखडे | Published: October 30, 2023 05:02 PM2023-10-30T17:02:00+5:302023-10-30T17:02:39+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.
वाशिम : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत असून, ३० ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन पुकारण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातही मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ काही गावांत नेत्यांना गावबंदी असल्याचे फलक झळकले होते. आता वाशिम येथे सोमवार, ३० ऑक्टोबरपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला सुरूवात झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेत, मनोज जरांगे - पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राम पाटील डोरले यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देवून आपला पाठिंबा दर्शविला.
आरक्षण मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार -
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे समाजबांधवांना अपेक्षीत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या पहिल्या आंदोलनाची सांगता करताना, सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले. सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी करतानाच आरक्षण मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धारही आंदोलकांनी केला.