वन व्यवस्थापन समित्या उरल्या नावापुरत्याच!
By Admin | Published: October 17, 2016 02:14 AM2016-10-17T02:14:07+5:302016-10-17T02:14:07+5:30
वाशिम जिल्हय़ात ५८ हजार ५८९ हेक्टर क्षेत्र वनाच्छादित; ८६ पैकी ५७ समित्या पडल्या बंद .
वाशिम, दि. १६- 'वन संपत्तीची सुरक्षा करा व मिळणारा नफा वाटून घ्या', हे सूत्र अंगीकारून कधीकाळी उदयास आलेल्या जिल्हय़ातील ८६ पैकी ५७ संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आजमितीस बंद पडल्या आहेत. परिणामी, वनाच्छादित ५८ हजार ५८९ हेक्टर क्षेत्राच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
वन परिक्षेत्रातील गावांचा सर्वांगीण विकास व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या मूळ उद्देशातून सन २00३ पासून महाराष्ट्र शासनाने संयुक्त वन व्यवस्थापन समित्या गठित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, वाशिम जिल्हय़ात ८६ समित्यांचे गठन करण्यात आले. त्यात वाशिम-रिसोड २२, मालेगाव १७, कारंजा-मंगरूळपीर १६ आणि मानोरा वन परिक्षेत्रात ३१ समित्या कार्यान्वित करण्यात आल्या; मात्र आजमितीस यातील केवळ २९ समित्याच कार्यान्वित असून उर्वरित ५७ समित्यांचे कामकाज पूर्णत: थांबले आहे.
संयुक्त वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून ज्यांची उपजीविका वनांवर अवलंबून आहे, असे गावातील लोक व वन विभाग. यांच्याद्वारे सयुक्तिक वन क्षेत्रावरील नफा, जबाबदारी, सुरक्षा आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आदी कामांची विभागणी केली जाते. या समित्यांनी वनांचे संरक्षण करणे व अवैध वृक्षतोड, वन क्षेत्रातील अतिक्रमण, वन वणवा, अवैध चराई आदीस प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. स्वत:कडे वर्ग केलेल्या वनांचे व्यवस्थापन करणे, ग्रामीण जनतेमध्ये वनांच्या महत्त्वाविषयी जागृती निर्माण करणे, हे संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे आद्य कर्तव्य आहे; मात्र जिल्हय़ातील ८६ पैकी तब्बल ५७ समित्यांचे कार्य मंदावल्यामुळे मूळ उद्देशांना ठायीठायी तडे पोहचत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.
संत तुकाराम वन ग्राम योजनेत जिल्हय़ाचे अपयश
संत तुकाराम महाराजांच्या नावाने राज्यभरात ह्यसंत तुकाराम वन ग्राम योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या सहभागी होतात, त्यांच्यामधून जिल्हा स्तरावरील तीन, तसेच राज्य स्तरावरील तीन उत्कृष्ट ठरणार्या समित्यांना संत तुकाराम वन ग्राम उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समिती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. वाशिम जिल्हय़ात मात्र या पुरस्कार योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. वाशिम वनपरिक्षेत्रात केवळ इलखी येथील वन व्यवस्थापन समितीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला.