माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:49+5:302021-05-11T04:43:49+5:30

परिवारातून राजकारणाचा वारसा लाभलेले प्रकाश डहाके हे सतत कारंजा मतदार संघाच्या विकासासाठी झटत राहिले. समाजकारण करता करता त्यांनी १९९५ ...

Former MLA Prakash Dahake passes away | माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन !

माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन !

Next

परिवारातून राजकारणाचा वारसा लाभलेले प्रकाश डहाके हे सतत कारंजा मतदार संघाच्या विकासासाठी झटत राहिले. समाजकारण करता करता त्यांनी १९९५ मध्ये कारंजा मतदारसंघाची राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव होऊन त्यांनी हार न मानता १९९९, २००४ मध्ये विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र, या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २००४ मध्ये ते केवळ ४७ मतांनी पराभूत झाले. अपयशाने खचून न जाता मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावत त्यांनी २००९ मध्ये निवडणूक लढवत कारंजा विधानसभा मतदारसंघातून तब्बल ३० हजार ३०७ मताधिक्याने विजय मिळविला. याच काळात प्रकाश डहाके यांनी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदही सांभाळले. डहाके हे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार असल्याने आणि त्यांचे जावई गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री असल्याने त्यांच्या सहकार्याने डहाके यांनी कारंजात महत्त्वाकांशी प्रकल्प राबवून शहरासह तालुक्याचा विकास केला. ते गेल्या पंधरा वर्षांपासून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद यशस्वीरीत्या सांभाळत होते. प्रकाश डहाकेंना राजकारणात ‘दादा’ म्हणून एक वेगळीच ओळख होती. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, खरेदी विक्री संघ तसेच सेवा सहकारी सोसायटीची निवडणुकीत त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने विजयी होतात. प्रकाशदादांची तालुक्यात प्रकाश पर्व म्हणून एक सामाजिक व राजकीय क्षेत्रात ओळख होती. दरम्यान, त्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याने अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते ९ मे रोजी कोरोनातून मुक्त झाले. दरम्यान, प्रकृती अचानक खराब झाल्याने १० मे रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

००

बॉक्स

अंत्यविधीसाठी गर्दी न करण्याचे कुटुंबीयांचे आवाहन

माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन झाले असून, कोणीही आमच्या राहत्या घरी अथवा स्मशानभूमीमध्ये येऊन अंत्यविधीसाठी गर्दी करू नये. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने घरूनच अंत्यदर्शन व अंत्यविधीची सोय सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे कोणीही खेडेगावातून तसेच शहरांमधून घराकडे येऊन गर्दी करु नये, अशी भावनिक हाक प्रकाश डहाके यांचे सुपुत्र कौस्तुभ यांनी दिली आहे.

००

Web Title: Former MLA Prakash Dahake passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.