वाशिममध्ये उपसरपंचाच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक
By सुनील काकडे | Published: February 19, 2023 05:25 PM2023-02-19T17:25:58+5:302023-02-19T17:27:39+5:30
वाशिम - जऊळका पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बोराळा येथील उपसरपंच विश्वास कांबळे (६०) यांची १८ फेब्रुवारी रोजी हत्या झाली. याप्रकरणी ...
वाशिम - जऊळका पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बोराळा येथील उपसरपंच विश्वास कांबळे (६०) यांची १८ फेब्रुवारी रोजी हत्या झाली. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी चार आरोपींना अटक केली आहे.
लिलाबाई विश्वास कांबळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, पती विश्वास श्रीपत कांबळे आणि मी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता गावातून ऑटोने किन्हीराजा येथे दवाखान्यात तसेच बाजार करण्यासाठी गेलो होतो. यादरम्यान पती लघूशंका करण्यासाठी गेले असता त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. धावत तिथे गेली असता तीन इसम पतीला पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात जबरदस्ती टाकत असल्याचे दिसून आले. त्यातील एकाने गाडीतील एक मोबाईल आणि काही कागदपत्रे गाडीच्या खाली फेकून दिले आणि गाडी सुसाट वेगाने तेथून निघून गेली.
या घटनेप्रसंगी त्याठिकाणी असलेल्या गोपाल खुरसडे नामक मुलाने गाडीचा क्रमांक नोंदवून घेतला. तो एम.एच. ४७ एन ०४३९ असा आहे. घटनेच्या काही तासानंतर पती विश्वास कांबळे हे गुंज फाट्यानजिक बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे कळले. तेथून त्यांना उपचारासाठी वाशिमला नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, राजकीय वैमनस्यातून गावातीलच केशव नरहरी वानखेडे, रामचंद्र नरहरी वानखेडे, शामसुंदर नरहरी वानखेडे आणि नामदेव नरहरी वानखेडे यांनी अन्य तीन लोकांना हाताशी धरून पतीची हत्या केल्याचा आरोप लिलाबाई कांबळे यांनी तक्रारीत केला. त्यावरून पोलिसांनी नमूद चारही आरोपींवर भादंविचे कलम ३०२, ४६४, १२० ‘ब’, सहकलम ३ अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा नोंदविला. चारही आरोपींना १९ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीशकुमार पांडे करीत आहे.