खाते क्रमांकाअभावी चार कोटीचा निधी परत जाणार
By Admin | Published: June 9, 2014 01:49 AM2014-06-09T01:49:08+5:302014-06-09T01:51:25+5:30
वाशिम जिल्हयात गारपीटग्रस्तांना ५४.४५ कोटीचे निधीवाटप; अनेक शेतकर्यांचे खातेक्रमांक अपाप्त
सनत आहाळे / वाशिम
जिल्हयात फेब्रुवारी व मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीटीमुळे जिल्हयातील ५२९ गावांमधील हजारो शेतकर्यांचे विविध पिकांचे कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानी दाखल राज्य शासनाने जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे ४कोटी ४ लाख ४२ हजार ८९८ रुपयांच्या निधीचे शेतकर्यांनी त्यांचे बॅक खाते क्रमांक न कळविल्याने वाटप होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकर्यांनी त्यांची खाते क्रमांक लवकर न कळविल्यास सदर शिल्लक मदतनिस शासनात परत करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येण्याचे संकेत दिसत आहेत. सन २0१३ मध्ये पावसाळयात सुध्दा वारंवार अतवृष्टी झाल्याने सतत पाऊस पडल्याने पूर आले,पावसाळयात अतवृष्टी व सततच्या पावसाने सोयाबिन, उडीद, मुग व अन्य खरिप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीतून स्वत:ला सावरत जिल्हयातील शेतकर्यांनी रब्बीच्या पिकांची पेरणी केली. रब्बीची पिके ऐन कापणीस येण्याच्या बेतात असतांना २३ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत जिल्हयात गावोगावी प्रचंड प्रमाणात गारपीट झाली. या गारपीटीमध्ये जिल्हाभरातील ५२९ गावांमधील हजारो हेक्टर शेतामधील पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे सर्वेक्षण करुन राज्य शासास अहवाल पाठवला त्या अहवालानूसार राज्य शासनाने वाशिम जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत म्हणून ५९ कोटी रुपयांचा निधी पाठवला. या निधीपैकी आतापर्यंत ५४ कोटी ९५ लाख ५७ हजार १0२ रुपयांचे वाटप जिल्हा प्रशासाने केले आहे. मात्र शेतकर्यांना वारंवार आवाहने करुनही शेतकर्यांनी त्यांचे बँक खातेक्रमांक कळविले नाहीत. त्यामुळे ४ कोटी ४ लाख ४२ हजार ८९८ रुपयांचा निधी अद्यापही वितरीत होऊ शकलेला नाही. तो लवकर वितरीत न झाल्यास या महिना अखेर शासनास परत केला जाण्याचे संकेत आहेत.