वाशिम जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; बुधवारपासून जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:52 AM2020-09-14T11:52:43+5:302020-09-14T11:52:52+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, कोरोनामुळे रविवारी आणखी चौघांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, कोरोनामुळे रविवारी आणखी चौघांचा मृत्यू झाला. आता मृत्युसंख्या ५४ वर पोहचली आहे. दरम्यान वाशिम शहरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय व्यापाऱ्यांनी रविवार, १३ सप्टेंबरच्या बैठकीत जाहिर केला.
जुलै व आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. रविवारी आणखी चार जणांचे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाने आतापर्यंत एकूण ५४ जणांचा बळी घेतले आहेत.
दरम्यान, वाशिम शहरातही रुग्णवाढीचा दर उंचावला असून, शहरातील एकूण रुग्णसंख्या ८०० च्या घरात पोहचली आहे. एकिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही, शहरातील बाजारपेठेत नागरिकांची दिवसेंदिवस प्रचंड गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. अनेकजण मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळत नाहीत. या पृष्ठभूमीवर व्यापारी मंडळ, युवा व्यापारी मंडळाने १२ व १३ डिसेंबर रोजी वाशिम येथे बैठक घेत जनता कर्फ्यूबाबत सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती वाशिम शहरात १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान केवळ हॉस्पिटल, मेडीकल, दूध संकलन व विक्री या अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली जाणार आहे. वाशिम शहरात स्वयंस्फुर्तीने ‘जनता कर्फ्यू’ची ही पहिलीच वेळ आली. जनता कर्फ्यूला शहरवासियांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी मंडळाचे जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, सचिव मनिष मंत्री, व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा, सचिव भरत चंदनानी यांनी केले.
चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद १३ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. जिल्हा कोविड रुग्णालयात ९ सप्टेंबर रोजी दाखल वाशिम शहरातील ६४ वर्षीय पुरुष व ८ सप्टेंबर रोजी दाखल मंगरूळपीर शहरातील ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ९ सप्टेंबर रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या व १० सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पिंप्री अवगण येथील ५५ वर्षीय महिला व मानोरा येथील ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत एकूण ५४ जणांचा मृत्यू झाला.