पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चौघांना कारावास
By admin | Published: May 5, 2017 07:32 PM2017-05-05T19:32:35+5:302017-05-05T19:32:35+5:30
नवविवाहीतेच्या मृत्यू प्रकरणी पती संदीप दामोदर पडघान सह चार आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश के.के.गौर यांनी ५ मे रोजी सुनावली.
तांदळी बु. (वाशिम) येथील प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
वाशिम : येथून जवळच असलेल्या तांदळी बु. येथील रहीवासी दिपाली उर्फ सोनू संदीप पडघान या नवविवाहीतेच्या मृत्यू प्रकरणी पती संदीप दामोदर पडघान सह चार आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश के.के.गौर यांनी ५ मे रोजी सुनावली. वाशिम तालुक्यातील तांदळी येथे २ आॅगस्ट २०११ रोजी सकाळी सकाळी ८.३० ते ९ च्या दरमयान सदर घटना घडली होती . फिर्यादी तुळशिराम उकंडा खिल्लारे, रा.वाघी बु. ता.मालेगाव , जिल्हा वाशिम यांनी वाशिम पोलिस स्टेशनला घटनेची फिर्याद दिली होती. आपल्या फिर्यादीत तुळशिराम खिल्लारे यांनी नमूद केले होते की, आपली मुलगी दिपाली उर्फ सोनू हिचे २५ मे २०११ रोजी तांदळी बु. येथील संदीप पडघान यांचे सोबत लग्न झाले होते. मुलगी दिपाली लग्नांनंतर सासरी नांदावयास गेली असता २५ हजार रुपये हुंडयाची मागणी करुन सासरच्या मंडळीनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे म्हटले. घटनेच्या दिवशी २ आॅगस्ट २०११ रोजी आपणास निरोप मिळाल्यावरुन वाघी येथे तिच्या घरी पोहाचल्यावर मुलगी दिपालीचा मृत्यू झाल्याचे कळाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती संदीप दामोदर पडघान, सासरा दामोदर किसन पडघान, सासू रुधाबाई दामोदर पडघान व ननंद वंदना संतोष पट्टेबहादूर सर्व राहणार तांदळी बु. ता.जि.वाशिम यांच्या विरुद्ध कलम ४९८ अ, ३०४ व ३४ भादवी अन्वये गुन्हा दखल करुन तपासानंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. सदर प्रकरणी न्यायालयाने सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासले. साक्षीपुराव्या वरुन गुन्हा सिद्ध झाल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधिश गौर यांनी आरोपी संदीप पडघान, दामोदर पडघान, रुधाबाई पडघान व वंदना पट्टेबाहदूर, या चारही आरोपींना कलम ४९८ अ अन्वये तीन वर्षाचा कारावस व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी सहायक अभियोक्ता जी.डी.गंगावणे यांनी काम पाहीले.